अहमदनगर: पतसंस्थांच्या थकबाकी वसुलीसाठी आवश्यक असलेले १०१ चे दाखल त्वरित मिळण्यासाठी अत्याधुनिक प्रणाली विकसित करण्यात आली असून, येत्या १ मे पासून राज्यातील पतसंस्थांची थकबाकी वसुली फेसलेस (ऑनलाईन) करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी येथे दिली.
जिल्हा उपनिबंधक कार्यालय व राज्य पतसंस्था फेडरेशनने तयार केलेल्या नवीन प्रणालीची माहिती देण्यासाठी तालुका उपनिबंधकांची बैठक गुरुवारी झाली. या बैठकीत आहेर बोलत होते. यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, स्थैर्य निधी सहकारी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, उपाध्यक्ष वसंत लोढा, फेडरेशनच्या सरव्यवस्थापिका सुरेखा लवांडे, सॉफ्टवेअरचे विनीत डावरे आदींसह सर्व तालुक्यांचे उपनिबंधक उपस्थित होते. पतसंस्थांच्या वसुलीसाठी सादर करण्यात आलेल्या अत्याधुनिक प्रणालीबाबत आहेर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पतसंस्थांच्या वसुलीसाठी आवश्यक असलेले १०१ चे दाखले उपलब्ध होत नव्हते. ही समस्या सोडविण्यासाठी डिजिटल, पेपरलेस, फेसलेस आदी ऑनलाईन सुविधांचा समावेश असलेली प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामध्ये १०१ च्या दाखल्यांचा प्रस्ताव दाखल करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कमी वेळेत तयार करणे शक्य होईल. सर्व तालुका उपनिबंधकांनी नवीन प्रणालीचा वापर सुरू करून आवश्यक सूचना कराव्यात असे आवाहन आहेर यांनी केले. काका कोयटे म्हणाले, पतसंस्थांची कर्ज थकबाकी वेगाने वसूल व्हावी यासाठी १०१ चे दाखले त्वरित मिळावेत, ही राज्य पतसंस्था फेडरेशनची अनेक वर्षांपासूनची मागणी हाेती. राज्य पतसंस्था फेडरेशन व मीडियाकॉन इंडिया यांनी संयुक्तपणे ‘१०१ कारवाई ’ हे अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार केले आहे. या प्रणालीला सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह सहकार विभागाचे सचिव व आयुक्त यांनी मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील जास्तीतजास्त पतसंस्थांनी या प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन कोयटे यांनी यावेळी केले.
..
सूचना फोटो:११ कोयटे नावाने आहे.