येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित साहित्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्राचार्य शेळके बोलत होते. महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे प्रमुख पाहुणे होते. प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत केले.
लेखक सुखदेव सुकळे यांच्या समर्पित प्रकाशयात्री या चरित्रपर ग्रंथास तर डॉ. शिवाजी काळे यांच्या गावकुसातल्या गोष्टी या ग्रामीण विनोदी कथासंग्रहास हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रा. शिवाजी बारगळ, मुग्धा शेळके, नामदेव सुकळे उपस्थित होते.
प्राचार्य शेळके म्हणाले, जगाला घडविण्याचे फार मोठे कार्य साहित्यिक करीत असतात. जगातल्या क्रांतीचा इतिहास हा साहित्यिकांच्या लेखननिर्मिती, वाचन प्रेरणेतून निर्माण झाला आहे. आपला समाज चांगला, वाईट कसा आहे हे लेखनातून कळते. त्यामुळे लेखकांनी समाजातील चांगुलपणा सकारात्मक दृष्टीने चित्रित केला तर नव्या पिढीला तशी दृष्टी येते. समाजाबद्दल प्रेम आणि आदर्श वाटावा असे लेखन लेखकांनी करावे.
प्रकाश कुलथे यांनी डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्यासारख्या साहित्यिकांनी स्वतः लिहिता लिहिता इतरांना लिहिते केल्याचे सांगितले.
पुरस्कार समिती प्रमुख डॉ. रामकृष्ण जगताप, कवी प्रा. पोपट पटारे, कवयित्री संगीता फासाटे उपस्थित होते.
----