श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील नगरपालिकेच्या भूमिपूजन कार्यक्रमात मानापमान नाट्य रंगले. कोनशिलेवर नावे टाकताना दुजाभाव केल्याचा आरोप करत भाजप नगरसेवकांनी कार्यक्रमावरच बहिष्कार टाकला. यावेळी आमदार बबनराव पाचपुते यांनी खडे बोल सुनावले.
रविवारी श्रीगोंदा शहरातील शिक्षक काॅलनीतील दीड कोटींच्या भुयारी गटार योजनेच्या कामाचे भूमिपूजन माजी आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते व नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केले होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, मनोहर पोटे, मुख्याधिकारी मंगेश देवरे व महाविकास आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते.
भूमिपूजन कोनशिलेवर आमदार बबनराव पाचपुते यांचे प्रमुख उपस्थितीत नाव होते. त्यांच्यावर माजी आमदार राहुल जगताप, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचे नाव टाकले होते. त्यामुळे भाजपच्या सर्व नगरसेवकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आणि राजकीय मानापमानाचे नाट्य रंगले.
आमदार बबनराव पाचपुते कार्यक्रमस्थळी आल्यावर ते समोरच्या खुर्चीवर बसत होते. त्यावेळी मनोहर पोटे यांनी, ‘दादा तुम्ही इकडे बसा’ अशी विनंती केली. त्यावर पाचपुते म्हणाले, ‘मी तुमच्या प्रोटोकॉलनुसार बसलो आहे. बरे झाले तुम्ही फोन केला म्हणून मला कार्यक्रमास उपस्थित राहता आले. आम्ही तुम्हाला विरोध करत नाही. मात्र सर्वांना बरोबर घेऊन कारभार करा. उद्या विकास कामात मदतच करू’ असे पाचपुतेंनी सांगितले.
शहरातील ३३ कोटी रूपये खर्चाच्या रस्त्यांची कामे आजही अपूर्ण आहेत. शहरात बगीचा व्हावा यासाठी साडेसहा कोटी मंजूर करून दिले. त्याचे काय? झाले हे माहीत नाही. आता मंत्र्यांना भेटण्याची गरज काय? महाविकास आघाडी सरकारने विकासासाठी किती पैसे दिले? असे खडेबोल पाचपुते यांनी सुनावले.
त्यावर महाविकास आघाडीचे पालिकेतील गटनेते मनोहर पोटे म्हणाले, कोरोनाचा काळ असताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मदतीने पालिकेला पाच कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. जिल्हा विकास आराखड्यातून पाच कोटी मिळाले आहेत.
---
आमदार बबनराव पाचपुते हे ज्येष्ठ लोकप्रतिनिधी आहेत. त्यांचा मान राखण्याचा नेहमी प्रयत्न केला. यापुढेही त्यांचा मान राखला जाईल. परंतु, काही वेळा त्यांनी व भाजपच्या नगरसेवकांनी शहराच्या विकासासाठी काही गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. मोठ्या नेत्यांनी मन मोठे ठेवावे.
-शुभांगी पोटे,
नगराध्यक्षा, श्रीगोंदा
---
..म्हणून टाकला बहिष्कार
बबनराव पाचपुते हे सर्वात ज्येष्ठ लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी शहराच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनी त्यांना दुय्यम स्थान दिले. हे बरोबर नाही. त्यामुळे आम्ही कार्यक्रमावर बहिष्कार टाकला, अशी प्रतिक्रिया उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे व गटनेत्या छाया गोरे यांनी दिली.
----
यांनी फिरविली पाठ..
भाजपचे नगरसेवक अशोक खेंडके, संग्राम घोडके, शहाजी खेतमाळीस, सुनीता खेतमाळीस, ज्योती खेडकर, मनिषा वाळके, मनिषा लांडे, वनिता क्षीरसागर, दीपाली औटी, महावीर पटवा यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवून संताप व्यक्त केला.
----
२० श्रीगोंदा पालिका
श्रीगोंदा शहरातील गटार योजनेच्या भूमिपजन प्रसंगी आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, नगराध्यक्षा शुभांगी पोटे व इतर.