अहमदनगर : शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला़ शहर परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला असून, जिल्ह्यात एकूण ३़७४ मि़मी़ पावसाची नोंद झाली आहे़आॅक्टोबर हिट सुरू आहे़ उन्हाचा पारा चांगलाच चढला आहे़ उन्हाचा पारा वाढल्याने उकाडा वाढला असून, जिल्ह्यात परतीच्या मान्सूनने शुक्रवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावली़ सायंकाळी अकाशात काळे ढग दाटून आले होते़ विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह सायंकाळी सातच्या सुमारास शहरात पाऊस सुरू झाला़ केडगाव उपनगरात गारा पडल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली़ दिवाळी तोंडावर आली आहे़ त्यामुळे बाजारात खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती़ अचानक सुरू झालेल्या पावसामुळे ग्राहकांची धावपळ उडाली़ सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरू होता़ रात्री उशिराने पावसाचा जोर ओसरला़ नगर शहरात सर्वाधिक १६ मि़ मी़ पावसाची नोंद झाली असून, नेवासा तालुक्यात १४ मि़मी़ पाऊस पडला आहे़ जिल्ह्यात ठिकठिकाणी तुरळक पाऊस झाला असून, संगमनेर, राहुरी, नेवासा, शेवगाव आणि कर्जतमध्ये हलक्या सरींचा पाऊस झाला़परतीचा मान्सून जिल्ह्यात पडतो,असा प्रशासनाचा अनुभव आहे़ परतीच्या मान्सूनला सुरुवात झाली़ पण शनिवारी दुपारनंतर आकाशात काळे ढग दाटून आले होते़ पावसाला सुरुवात झाल्याने उकाडा वाढला आहे़ त्यामुळे आणखी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त होत आहे़ पूर्वीचा पाऊस जिल्ह्यातील काही ठिकाणी कमी झालेला आहे़ त्यामुळे रब्बीची पिके करपू लागली आहेत़ या पावसामुळे जिल्ह्यातील रब्बीच्या पिकांना दिलासा मिळाला आहे़(प्रतिनिधी)
परतीचा मान्सून बरसला
By admin | Updated: October 18, 2014 23:45 IST