अहमदनगर : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तीनशे एकरावरील मका व ज्वारी पिकाची पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ भरत राठोड यांना दिले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिली़जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राहुरी कृषी विद्यापीठ येथे चारा प्रकल्प राबविण्यात आला़ जिल्हा प्रशासनाने ४० लाख रुपये खर्चून हा प्रकल्प राबविला़ त्याचबरोबर प्रकल्पासाठी मुळा धरणात एकूण २०० दशलक्ष घनफूट पाणी राखीव ठेवण्यात आले होते़ भांडवल आणि पाणी देऊनही अपेक्षेप्रमाणे पीक आले नाही़ ‘लोकमत’ ने ही बाब उघडकीस आणली़ सोमवारच्या अंकात राहुरी विद्यापीठाचा चारा प्रकल्प करपला, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते़ या वृत्ताचे छावणी चालकांनी स्वागत केले़ जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनीही वृत्ताची दखल घेऊन प्रकल्प प्रमुख राठोड यांना विद्यापीठातील चारा प्रकल्पाची पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत़ जिल्ह्यात दुष्काळ आहे़ जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही़ त्यामुळे जिल्ह्यात ३५ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत़ छावण्यांची भिस्त विद्यापीठातील चारा प्रकल्पावर आहे़ छावण्यांना प्रति टन चार हजार रुपयांनी चाऱ्याचे वाटप विद्यापीठाकडून सुरू आहे़ मात्र चाऱ्यापेक्षा कापणीवरच अधिक खर्च होत असल्याचे चित्र आहे़ (प्रतिनिधी)नियमांचे पालन न करणाऱ्या छावण्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे़ दंडाची मोठी यादी जिल्हा प्रशासनाने तयार केली असून, छावण्यांना प्रति जनावर प्रतिदिन दंड आकारला जाणार आहे़ छावण्यांवर दंडाची कारवाई करण्याची दाखविलेली तत्परता प्रशासन विद्यापीठाबाबतही दाखविणार का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़
राहुरी विद्यापीठातील चारा प्रकल्पाची होणार चौकशी
By admin | Updated: June 7, 2016 23:34 IST