राहुरी :
दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणातून सोमवारी सकाळी सहा वाजता धरणाच्या उजव्या कालव्यातून उन्हाळी शेतीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले. दरम्यान, वांबोरी चारीचे आवर्तन महिनाभर सुरूच राहणार आहे, अशी माहिती धरण शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पहिल्या टप्प्यात ७०० क्युसेक पाणी सोडण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात ९०० क्युसेक, तर तिसऱ्या टप्प्यात सोळाशे क्युसेकने पाणी सोडण्यात येणार आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या २० हजार ४५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. त्यापैकी जिवंत पाणीसाठा १५ हजार ९५० दशलक्ष घनफूट आहे. मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून यापूर्वी २०० क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. याशिवाय वांबोरी चारीतून १५ फेब्रुवारीपासून बंधाऱ्यांसाठी पाण्याचे आवर्तन सुरू आहे. वांबोरी चारीचे आवर्तन आणखी महिनाभर चालणार असून, एकशे दोन बंधारे पाण्याने भरण्यात येणार आहेत.
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे ऊस, गहू,
चारा पीक, फळबाग, कांदा पिके यांना दिलासा मिळणार आहे.
....
आणखी एक आवर्तन सुटणार
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून सोमवारी सकाळी ६ वाजता पाणी सोडण्यात आले आहे. ३० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. आणखी एक आवर्तन मे महिन्यात सुटू शकेल.
- अण्णासाहेब आंधळे,
मुळा धरण, शाखा अभियंता.