तीसगाव : पाथर्डी व शेवगाव तालुक्यांतील ५२ चारा छावण्यांचे सप्टेंबर २०१९ महिन्यातील ४ कोटी २१ लाख रुपये अनुदान थकीत असून, ते तातडीने द्यावे, अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली.
खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात दुष्काळी भागात जनावरांसाठी राज्य सरकारने स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अनुदानित चारा छावण्या सुरू केल्या होत्या. चारा छावण्यांचे सप्टेंबर, ऑक्टोबर २०१९ या दोन महिन्यांच्या कालावधीतील जिल्ह्यातील १३ कोटी २९ लाख ९३ हजार २०३ रुपये अनुदान देणे बाकी आहे. यामध्ये शेवगावमध्ये २३ चारा छावण्यांचे २ कोटी ११ लाख रुपये व पाथर्डी तालुक्यातील २९ चारा छावण्यांचे दोन कोटी १० लाख अनुदान मिळणे बाकी आहे.
छावणीचालकांनी वरील कालावधीतील थकीत अनुदान वारंवार मागणी करूनही अद्याप मिळाले नसल्याने छावणीचालक आर्थिक संकटात सापडलेले आहेत. काही चारा छावणीचालकांनी लाखो रुपये उसनवार घेऊन, तसेच उधारीवर चारा खरेदी, पशुखाद्य व इतर साहित्य घेतलेले आहे. मात्र, शासन अनुदान न मिळाल्याने उधारी देणे बाकी असल्याने छावणीचालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. स्वयंसेवी संस्था आर्थिक संकटात सापडल्या आहेत. चारा छावण्यांचे थकीत अनुदान मिळण्यासाठी यापूर्वी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांकडे वेळोवेळी मागणी करून पाठपुरावा केला आहे. मात्र, उपयोग झाला नाही. तरी चारा छावण्यांचे राहिलेले अनुदान तातडीने मिळावे, अशी मागणी राजळे यांनी निवेदनात केली आहे.