अहमदनगर : सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार नगर शहरातील अनाधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची मोहिम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. आत्तापर्यंत महापालिकेने वाहतुकीला अडथळा ठरणारी १७ मंदिरे पाडली आहेत. ही मंदिरे पाडण्याची कारवाई थांबविण्यात यावी, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी (दि़ १६) मोर्चा काढण्यात आला.नगर शहरातील पावन गणपती मंदिरात सकल हिंदू समाजाच्यावतीने आरती करुन या मोर्चाचा प्रारंभ करण्यात आला. माळीवाडा येथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. दरम्यान मोर्चाच्या मार्गावरील सर्व दुकाने बंद करण्याचे आवाहन व्यावसायिकांना केले. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहोचल्यानंतर पाच लहान मुलांच्या हस्ते जिल्हाधिका-यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात सुमारे दीडशे ते दोनशे कार्यकर्ते सहभागी झाले.जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शहरातील ६८ मंदिरे पाडण्याची कार्यवाही महापालिकेकडून सुरु आहे. महापालिकेच्या सर्व्हेक्षणात फक्त हिंदूंचीच मंदिरे आहेत. आत्तापर्यंत फक्त हिंदूंच्याच मंदिरांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई चुकीची आहे़ सुप्रिम न्यायालयाने अनाधिकृत भोंगे व कत्तलखान्यांवरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, महापालिका तेथे कारवाई करीत नाही. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक स्थळांवरही कारवाई होऊ नये, असे या निवेदनात म्हटले आहे.
हिंदू मंदिरांवरील कारवाईविरोधात नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 13:16 IST