अहमदनगर : रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ ज. बोठे हा महिनाभरापासून पसार असून, प्रयत्न करूनही पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे बोठेला फरार घोषित करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला असून, त्यावर सोमवारी सुनावणी आहे. एकूणच ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव शिवारात हत्या झाली. या गुन्ह्यात पोलिसांनी मारेकऱ्यांसह पाच जणांना अटक केली आहे; परंतु हत्याकांडाचा सूत्रधार बोठे गेल्या महिनाभरापासून पसार आहे. पोलिसांच्या विविध पथकांनी शोध घेऊनही अद्याप बोठेचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे पोलीस बोठेच्या विरोधात स्टँडिंग वाॅरंट (फरार घोषित करण्याची प्रक्रिया) काढणार आहेत. त्यासाठी पोलिसांनी पारनेर न्यायालयात अर्ज केला असून, त्यावर सोमवारी (दि.४) सुनावणी होणार आहे. न्यायालयाने परवानगी दिली, तर बोठेला फरार घोषित करून त्याच्या संपत्तीवर टाच आणण्यासह इतर कायदेशीर बाबी करण्यास पोलिसांना सोयीचे होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून समजली.
--------------
आणखी महत्त्वपूर्ण पुरावे
पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून रेखा जरे यांच्या घराची अनेकदा झडती घेतलेली आहे. पहिल्या झडतीत पोलिसांना रेखा जरे यांच्या हस्ताक्षरातील एक पत्र मिळाले. त्या पत्रात आरोपीविरोधात मजकूर असल्याचे समजते, तसेच एक डायरी व अन्य काही पुरावेही मिळाले असल्याची चर्चा आहे; परंतु तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी या बाबी गोपनीय ठेवल्या आहेत.