जामखेड : दुष्काळी गावांची टँकरमुक्तीकडे वाटचाल व्हावी, पिण्याच्या पाण्याचा, शेती सिंचनाचा प्रश्न सुटावा यासाठी सिंचन विहिरींच्या खोदाईसाठी येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी भूजल सर्वेक्षण विकास व यंत्रणा विभागाचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची भेट घेतली. विहिरी खोदण्यासाठी येत असलेल्या अडचणींची माहिती देऊन हा प्रश्न मार्गी लावला. यामुळे जामखेड तालुक्यातील ८७ गावे व कर्जत तालुक्यातील ६२ गावांना याचा लाभ मिळणार आहे.
पवार हे मतदारसंघात पावसाचे पडलेले पाणी अडविण्यासाठी विविध योजना राबवत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना २०२०-२०२१ अंतर्गत कर्जत-जामखेड मतदारसंघात सिंचन विहिरी खोदाईसाठी अनेक अडचणी येत असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आले.
भूजल सर्वेक्षण विभागाने कर्जत व जामखेड मतदारसंघांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार व सिंचन विहिरी घेण्याबाबत बदललेल्या कार्यपद्धतीमुळे मतदार संघातील अत्यल्प गावे सिंचन विहीर योजनेसाठी पात्र होती. त्यामुळे इतर गावातील लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले होते. पवार यांनी याबाबत भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक कलशेट्टी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. नुकतीच त्यांनी कलशेट्टी यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर सिंचन विहिरी खोदण्याबाबत भूजल सर्वेक्षण विभागाकडून अवलंबिण्यात येत असलेली कार्यपद्धती काही अंशी बदलण्यात येणार असल्याचे कलशेट्टी यांनी सांगितले. त्यामुळे याचा लाभ कर्जत-जामखेड तालुक्यात होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
----
०८ रोहित पवार
आमदार रोहित पवार यांनी मुंबई येथे भूजल सर्वेक्षण संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची भेट घेतली.