अहमदनगर : विधिमंडळाच्या सोमवारी पार पडलेल्या अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी चांगले काम केले आहे. याचा अर्थ विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला किंवा भास्कर जाधव यांना देण्याचा कोणताही विचार नाही. काँग्रेसमध्येही अनेक भास्कर जाधव आहेत, असे सांगत विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
महसूलमंत्री थोरात यांनी शनिवारी अहमदनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. विधानसभेत तालिका अध्यक्ष म्हणून जाधव यांच्या कामाचे सध्या कौतुक होत आहे. त्यानंतर त्यांना अध्यक्षपद देण्याची चर्चा सुरू आहे. तसेच वनमंत्री संजय राठोड यांच्या रिक्त जागेवर काँग्रेसला मंत्रीपद व शिवसेनेला अध्यक्षपद देण्याबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, जाधव यांनी अधिवेशनात चांगलेच काम केले. म्हणून त्यांनाच हे पद द्यावे, असे काही नाही. काँग्रेसमध्येही सक्षमपणे काम करू शकणारे नेते आहेत. शिवाय जागा वाटपात हे पद काँग्रेसकडे आहे. त्यामध्ये बदल करण्यासंबंधी कोणतीही चर्चा झालेली नाही. तसा कोणताही विचार नाही. अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशात होऊ शकली नाही. त्यासाठी बरीच मोठी प्रक्रिया आहे. त्यात कोरोनामुळे अधिवेशन दोनच दिवसांचे होते. दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. शुक्रवारी मी आणि मंत्री नितीन राऊत आपापल्या कामासाठी दिल्लीत होतो. अध्यक्षपद निवड किंवा अदलाबदलीच्या विषयांचा या दौऱ्याशी कोणताही संबंध नव्हता. पूर्वी माझ्या एकट्यावरच कामाचा ताण जास्त होता. पक्षातील आणि सरकारमधीलही महत्त्वाची पदे आणि जबाबदाऱ्या माझ्याकडेच होत्या. त्यामुळे पक्षाने तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांना त्या पदाचा राजीनामा देऊन प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. यामुळे या पदावरील पक्षाचा दावा गेलेला नाही. अध्यक्षपद काँग्रेसकडेच असून जेव्हा निवडणूक होईल, त्यावेळी त्या पदावर सक्षम नेता दिला जाईल. तसे उमेदवार आमच्या पक्षात आहेत, असे थोरात यांनी स्पष्ट केले.
----------
इंधन दरवाढीने अटलबिहारींचा आत्मा दुखावला असेल
देशात काँग्रेसची सत्ता असताना पेट्रोलचे दर सात पैशांनी वाढले होते. त्यावेळी स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी लोकसभेवर बैलगाडीचा मोर्चा काढला होता. तोच व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. आज शंभर रुपयांच्या पुढे पेट्रोल गेल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांचा आत्मा दुखावला असेल, असे सांगत थोरात यांनी केंद्र सरकारवर टीका केली. महागाईमुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यात कोरोनाची स्थिती भयावह होती. नाशिकचा अपघात वगळता राज्यात कोरोना नियंत्रणात सरकारला मोठे यश आल्याचे ते म्हणाले.
------------
सहकार मंत्रालयाचा हेतू समजला नाही
केंद्र सरकारमध्ये सहकार मंत्रालय निर्माण करण्यात आले आहे. या खात्याचा हेतू मात्र कळाला नाही. रिझर्व्ह बँकेचे सर्वच बँकांवर यापुढील काळात नियंत्रण राहणार आहेत. चेअरमन, संचालक यांचे अधिकार कमी करून टाकले आहेत. हे मात्र सहकाराच्या तत्त्वाला धरून नाही. त्यांचे काही चुकले असेल तर शिक्षा झाली पाहिजे. मात्र, सहकार टिकला पाहिजे. नव्या मंत्रालयामुळे सहकार अधिक टिकला तर चांगलेच आहे, असे थोरात म्हणाले.