केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथे गेल्या आठ दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. पुन्हा शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याचे चित्र गावांमध्ये दिसून येत आहेत.
जेऊर परिसरात सद्यस्थितीत अनेक रोहित्र बंद असून अनेक वाड्या-वस्त्या अंधारात आहेत. गेल्या आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून शेतकरी वर्ग वैतागला आहे. शेतामध्ये कांदा लागवडीचे काम सुरू असून वीज नसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत.
महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी यांना वारंवार सूचना देऊनही वीज सुरळीत करण्यात येत नाही. आजमितीला लक्ष्मी माता मळा, लिगाडे वस्ती, शेटे वस्ती, इमामपूर परिसर तसेच इतर ठिकाणी अनेक रोहित्र बंद आहेत. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कर्मचारी कमी पडत असल्याचे सांगण्यात येते. महेंद्र तोडमल, सूरज तोडमल, विकास पाटोळे, पांडू शेटे यांनी संताप व्यक्त करत महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.