अहमदनगर : महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी अखेरच्या दिवशी ३१ डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशांना बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली. उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी सर्व विभागप्रमुखांना याबाबतचा आदेश जारी केला आहे. आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती देण्याची महापालिकेतील ही पहिलीच घटना आहे.
जिल्हाधिकारी तथा आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत महापालिकेत बैठक झाली. यावेळी भोसले यांनी कामकाजाचा आढावा घेत ३१ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व आदेशांना स्थगिती दिली. महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार हे ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे आयुक्तपदाचा अतिरक्त पदभार जिल्हाधिकारी भोसले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पदभार स्वीकारताच भोसले यांनी तत्कालीन आयुक्त मायकलवार यांच्याकडून अखेरच्या दिवशी झालेल्या सर्व आदेशांना स्थगिती देण्याचा धाडसी निर्णय घेतला. तत्कालीन आयुक्त मायकलवार यांनी अखेरच्या दिवशी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याचे अधिकार व कर्तव्यांबाबतचा महत्त्वाचा आदेश काढला. यामध्ये उपायुक्त व वैद्यकीय आरोग्य अधिकारी हे पद समकक्ष असल्याने उपायुक्त कर यांच्या नियंत्रणाखाली असलेले सर्व कामकाज यापुढे वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली राहील, तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना ५ लाखांपर्यंत खर्चाचे अधिकारही या आदेशाने बहाल करण्यात आले होते. मायकलवार यांच्या या आदेशाबाबत नागरी कृती मंचाचे अध्यक्ष शशिकांत चंगेडे यांनी जिल्हाधिकारी तथा आयुक्त भोसले यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत भोसले यांनी मायकलवार यांच्या जारी केलेल्या सर्व आदेशांना स्थगिती दिली. माजी आयुक्त मायकलवार यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. आरोग्य विभागासह अन्य विभागांसाठी माकलवार यांनी आदेश पारित केलेले आहेत. सदर आदेशांची तात्काळ अंमलबजावणी करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले होते. मात्र, हे आदेश विभागांकडे जाण्यापूर्वीच ते स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे हे आदेश कागदावरच आहेत.
....
- वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना जाता-जाता असे अधिकार देणे बेकायदेशीर आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशाला स्थगिती दिली. हे नागरी कृती मंचाचे मोठे यश आहे.
- शशिकांत चंगेडे, अध्यक्ष, नागरिक कृती मंच