साईबाबा मंदिर व दत्तमंदिर ही मोठी देवस्थानेही याच रस्त्यावर आहेत. त्यामुळे अनेक भाविक भक्तांचे या रस्त्यावरून नेहमीचे येणे-जाणे असते. रस्त्याच्या अडचणीमुळे देवदर्शनही समाधानाने करता येत नसल्याची प्रतिक्रिया भाविकांतून व्यक्त केली जाते. या मंदिरांसाठी तालुक्यातील नेतेमंडळीकडून वेळोवेळी निधी मिळाला असला तरी या रस्त्याच्या मजबुतीकरण व दुरुस्तीच्या कामासाठी मात्र या दिग्गज नेतेमंडळीकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने पावसाचे पाणी या खड्ड्यांत साचल्यानंतर हा रस्ता पूर्णपणे चिखलात हरवून जातो. खड्डा कुठे आणि रस्ता कुठे हेच वाहनधारकांना कळत नाही. त्यामुळे अनेक छोटे अपघात होत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणीत या रस्त्यामुळे आणखीनच भर पडली आहे. शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनाही या रस्त्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. परिसरातील नागरिकांना आपल्या दैनंदिन कामांसाठी रस्त्यावरून ये-जा करणे जिकिरीचे ठरत आहे. एखाद्या अत्यवस्थ रुग्णाला या रस्त्याने दवाखान्यापर्यंत नेणेही अत्यंत कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. परंतु त्याकडे पुढारी, नेतेमंडळी व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांना अजून किती काळ या रस्त्याच्या मरणयातना सोसाव्या लागणार आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
(११ मुठेवाडगाव )