आॅनलाईन लोकमतगणोरे, दि़ ३० - डाळिंबाची झाडं दूध पित आहेत, शेतकऱ्यांच्या कांद्यासह भाजीपाल्याचं खत होत आहे, असे चित्र पहायला मिळणार आहे, ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारच्या निषेधार्थ एक जूनला शेतकरी संपावर गेल्यानंतऱ तसा निर्णयच वीरगावच्या ग्रामस्थांनी घेतला आहे़ जिल्हा परिषदेच्या देवठाण (ता. अकोले) गटातील शेतकऱ्यांनी १ जून पासून संपावर जाण्याचा निर्धार केला आहे. वीरगाव येथे मंगळवारी शेतकरी संपासाठी बैठक घेण्यात आली. वीरगावचे सरपंच दिनेश वाकचौरे यांनी सर्व शेतकऱ्यांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले. वीरगाव येथील शेतकऱ्यांनी सोमवारी झालेल्या ग्रामसभेत संपावर जाण्याचा निर्णय घेतला़शेतीमालाला परवडणारा बाजारभाव मिळत नाही, सातत्याने विस्कळीत वीज पुरवठा तसेच कर्जमाफीचा निर्णयही सरकार घेत नाही. सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात असून, शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. भाजपच्या नादाला लागलो, अन् तोंडघशी पडलो, अशा संतप्त भावना काही शेतकऱ्यांनी सभेत व्यक्त केल्या. भाजपसह सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी वीरगावच्या ग्रामपंचायतीमध्ये संपाचा ठराव मंजूर केला आहे. दूध, भाजीपाला व शेतीमालाची बाजारात विक्री करणार नाही, असा निर्धार करताना शेतीमालाची विल्हेवाट लावण्याचीही चर्चा सभेत झाली. दूध जमिनीतील जीवाणू निर्मितीसाठी पोषक असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात उत्पादित होणारे दूध थेट डाळिंबाच्या झाडांना ओतण्याचा व फवारणी करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला़ कांदा, भाजीपाला शेतात व सेंद्रिय शेणखताच्या खड्ड्यात टाकून त्यापासून खत तयार करण्याचा निर्णयही ग्रामस्थांनी घेतला़ जनावरांच्या चाऱ्यासाठी चांगल्या भाजीपाल्याचा वापर होईल. शेतकऱ्यांच्या पोरांसह कुत्र्या- मांजरांनही पोटभर दूध मिळेल. मात्र, शेतकरी दूध, भाजीपाला विकणार नाही, असा निर्धार सभेत करण्यात आला़ यावेळी अकोले तालुका अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, अगस्ती साखर कारखान्याचे संचालक रामनाथ वाकचौरे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
१ जूनपासून डाळिंबाची झाडं दूध पितील; भाजीपाल्याचं खत होईल
By admin | Updated: May 30, 2017 15:07 IST