अहमदनगर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांची मोट बांधत इतर पक्षांतील जे बरोबर येतील, त्यांना बरोबर घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय पुणे येथील बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ऐनवेळी कोण कुणाला साथ देईल, हे पाहणेच औत्सुक्याचे आहे.
जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे जिल्ह्यातील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीस काँग्रेसकडून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार अरुण जगताप, डॉ. किरण लहामटे, नीलेश लंके, रोहित पवार, आशुतोष काळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, उदय शेळके, प्रताप ढाकणे, राहुल जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते. सकाळी अकरा वाजता सुरू झालेली बैठक दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू होती. पवार यांनी जिल्ह्यातील सर्व नेत्यांची मते जाणून घेतली. जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्यावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे सर्व नेते एकत्रित निवडणुकीला सामोरे जातील, असेही यावेळी ठरले. तसेच इतर पक्षांतील जे कोणी बरोबर येण्यास इच्छुक आहेत, त्यांना बरोबर घेण्यावर बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा बँकेत महाविकास आघाडी अर्थात शिवेसना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत आहेत. राष्ट्रवादी यापूर्वीही थोरात गटासोबतच असे. यावेळीही राष्ट्रवादी थोरात यांच्यासोबतच आहे. जिल्हा बँकेची निवडणूक विखे व थोरात गटातच लढली जाते. फरक एवढाच, की पूर्वी विखे हे काँग्रेसमध्ये होते. ते आता भाजपमध्ये आहेत. जिल्हा बँकेत विखे हे भाजपच्या पॅनलचे नेतृत्व करत आहेत. काँग्रेसमधील विखेसमर्थक आजही त्यांच्यासोबतच दिसतात. पण, भाजपचे माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले व जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी नुकतीच महसूलमंत्री थोरात यांची त्यांच्या संगमनेर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. कर्डिले - थोरात भेटीची चर्चा सुरू असतानाच पवार यांनीही जे बरोबर येतील, त्यांना बरोबर घेण्याचे संकेत दिले आहेत. सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आल्याने भाजप हाच एकमेव विरोधी पक्ष आहे आणि भाजपचे नेतृत्व विखे यांच्याकडे आहे. त्यामुळे विखे गटाच्या उमेदवारांना फोडण्याचा प्रयत्न थोरात यांच्याकडून होण्याची दाट शक्यता आहे.
...
बिनविरोध करण्यावर भर
सहकारी संस्था मतदारसंघातून १२ तालुक्यातून परस्परविरोधी उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. यापैकी कोपरगाव, पाथर्डी, श्रीगोंदा आणि जामखेड हे तालुके बिनविरोध होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. परंतु, त्यासाठी काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना माघार घ्यावी लागणार असून, काही तालुक्यात भाजपला माघार घ्यावी लागेल. त्याबदल्यात उमेदवारांचा प्रवेश करून घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोण कुणासोबत असणार याची उत्सुकता आहे.