अहमदनगर : नगर शहर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा असून काँग्रेसच्या ताब्यात राहणार असल्याचे सांगत शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी पुन्हा स्थानिक उमेदवार द्या, अशी मागणी केली. तसेच निवडणुकीसाठी दाखल इच्छुकांच्या यादीत सत्यजित तांबे यांचा अर्ज दाखल नसल्याचे माध्यमांना ठळकपणे कळविले. यावरून शहर मतदारसंघातून उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये राजकारण सुरू असल्याचे चित्र समोर आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मतदारसंघनिहाय इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. हे अर्ज दाखल करण्यास शनिवारी अखेरची मुदत होती. त्यानुसार नगर शहर ब्लॉक कमिटीकडे सहा अर्ज दाखल झाले आहेत. यात स्वत: सारडा, महिला शहर जिल्हाध्यक्षा सविता मोरे, माजी नगराध्यक्ष दीप चव्हाण, विनायक देशमुख, सुभाष गुंदेचा आणि उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचा समावेश आहे. हे अर्ज ठरावासह आता प्रदेश समितीकडे पाठविण्यात येणार आहेत. इच्छुकांच्या दाखल अर्जाची सोमवारी मुंबईत छाननी होऊन केंद्रीय निवड समितीकडे अंतिम निर्णयासाठी सोपविण्यात येणार आहे. दरम्यान, शहर मतदारसंघातून उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षातून नवीन राजकारण सुरू झाले आहे. या ठिकाणी सत्यजित तांबे हे बाहेरचा उमेदवार आहे, असा प्रचार खुद्द शहराध्यक्ष सारडा यांच्याकडून सातत्याने सुरू आहे. एवढेच नाही तर माध्यमांना पाठविलेल्या इच्छुकांच्या अर्जाच्या वृत्तात ठळकपणे तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याचे नमूद केले आहे. यामुळे केंद्रीय निवड समितीने दाखल सहा इच्छुकांतून एकाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. ही मागणी करत असताना सारडा यांनी देखील उमेदवारीसाठी इच्छुकांतून अर्ज दाखल केलेला आहे. सारडा वगळता तांबे हे बाहेरचे उमेदवार आहेत, असा आक्षेप कोणी घेतलेला नाही. (प्रतिनिधी)
बाहेरच्या उमेदवारावरून काँग्रेसमध्ये राजकारण
By admin | Updated: August 9, 2014 23:32 IST