अहमदनगर : पोलीस शिपाई पदाच्या ४९ जागांसाठी झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाली आहे. ह्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी तातडीने समिती नियुक्त करण्यात आली आहे. संपूर्ण भरती प्रक्रियेचे चित्रीकरण झाले असून ही प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शी झाल्याचा दावा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी केला आहे.पोलीस भरती प्रक्रियेमध्ये एका उमेदवाराचे शारीरिक चाचणी परीक्षेत गुण वाढविण्यासाठी भरती प्रक्रियेच्या ठिकाणी नेमणुकीस असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने पैसे घेतल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना डॉ. त्रिपाठी म्हणाले, या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना दिले आहेत. चौकशी अहवाल तातडीने येईल. त्यामध्ये कोणी दोषी आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. ज्या उमेदवाराबाबत चर्चा होत आहे, तो नापास झालेला आहे. तसेच तो लेखी परीक्षेसाठीही पात्र झालेला नव्हता. याचा अर्थ ही भरती प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शी आहे. कोणीतरी एखाद्याला परस्पर फसविण्याचा प्रकार झाला असण्याची शक्यता आहे. ते चौकशीत समोर येईल. संपूर्ण भरती प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण झालेले आहे. तसेच उमेदवारांनाही आक्षेप नोंदविण्याची संधी देण्यात आली होती. उमेदवारांच्या शंकांचे तत्काळ निरसन करण्यात आले आहे. पोलीस भरतीबाबत उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे प्रक्रिया सुरू होण्याआधीच आवाहन केले होते. पोलीस मुख्यालयात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या महिलेकडून तिच्या भाच्याचे गुण वाढविण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने पैसे घेतल्याची चर्चा आहे. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित महिलेचा जबाब अतिरिक्त पोलीस अधीक्षक देशमुख यांनी नोंदवून घेतला आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्याची दोन दिवसांपूर्वीच श्रीरामपूर येथे रवानगी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
पोलीस भरतीत घोटाळा?
By admin | Updated: April 20, 2016 23:42 IST