अहमदनगर : चौफेर शोध घेऊनही सापडत नसल्याने रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याच्या विरोधात आता पोलीस स्टँडिंग वॉरंट (फरार घोषित करण्याची प्रक्रिया) काढण्याच्या तयारीत आहेत. याबाबत जिल्हा न्यायालयात लवकरच अर्ज करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी नगर - पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात हत्या झाली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. हत्याकांडाचा सूत्रधार बोठे मात्र गेल्या वीस दिवसांपासून फरार आहे. पाच पोलीस पथके अविरत त्याचा शोध घेत आहेत. सर्वत्र शोध घेऊनही सापडत नसल्याने आता पोलीस न्यायालयाच्या माध्यमातून बोठे याला फरार आरोपी म्हणून घोषित करण्याच्या तयारीत आहेत. हत्याकांडातील मूख्य सूत्रधारच फरार असल्याने गुन्ह्यातील पुढील तपास थंडावला आहे. बोठे याने सुपारी देऊन जरे यांची हत्या का केली, हे अद्याप समोर आलेले नाही. त्याच्या अटकेनंतरच याचा खुलासा होणार आहे. दरम्यान, बोठेचा जिल्हा न्यायालयाने १६ डिसेंबर रोजी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. आता जामिनासाठी बोठे हा औरंगाबाद खंडपीठात अर्ज करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बोठेला अटक करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.