अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या विजयाच्या गुलालावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. जिल्हाधिकारी यांचे जमावबंदीचे आदेश लागू असल्याने विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. नगर शहरात जिल्ह्यातील निकालाचा गुलाल उधळला जाण्याची शक्यता आहे. सर्वच पक्षांचे मुख्यालय नगरमध्ये आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षाचे उमेद्वार निवडून आले तरी त्याचा जल्लोष नगरमध्ये राहणार आहे. याशिवाय स्थानिक विजयी उमेद्वाराचाही जल्लोष राहणार आहे. विजयाचा गुलाल उधळताना कुठेही शांततेला गालबोट लागणार नाही,यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. नगर शहरामध्ये सकाळी आठपासूनच चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राजकीय पक्षांची कार्यालये, खासदार-आमदारांची निवासस्थाने, उमेदवारांची निवासस्थाने आदी ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जल्लोष करताना कुठेही गडबड होणार नाही, यावर पोलीस नजर ठेवणार आहेत. शहरात तब्बल दीडशे पोलीस विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये चार पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांचे जमावबंदीचे आदेश लागू असल्याने विजयी उमेद्वाराला मिरवणूक काढता येणार नाही. उमेदवाराच्या विजयाची घोषणा करताच त्यांच्या हाती पोलीस नोटीस देणार आहेत. मिरवणुकीसाठी कोणत्याही प्रकारे परवानगी दिली जाणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. अहमदनगर शहर मतदारसंघातील मतमोजणी एम.आय.डी.सी. येथील वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. शहराचे पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
विजयाच्या गुलालावर पोलिसांची नजर
By admin | Updated: October 19, 2014 00:38 IST