अकोले पोलीस ठाण्यात एका पोलिसाने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची घटना घडल्यानंतर काही दिवसांत राजूर पोलीस ठाण्यात एका हवालदाराने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग केला. यानंतर तिसऱ्याच दिवशी राजूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी एकमेकांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न करत असल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
या क्लिपमध्ये एक पोलीस कर्मचारी किरण नावाच्या व्यक्तीच्या पत्नीला हाताशी धरून पोलीस स्टेशनमध्ये वरचढ ठरत असलेल्या एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा सल्ला समोरच्या इसमाला देत आहे. कुणाविरुद्ध गुन्हा दाखल करायचा याचे नावही या क्लिपमध्ये उच्चारण्यात आले आहे. राजूर पोलीस स्टेशनमध्ये भयंकर गटबाजी पडल्याचे व पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत असल्याचे यातून समोर आले आहे.
यासंदर्भात ‘लोकमत’ने पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्याशी संपर्क साधला असता क्लिपची खातरजमा केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.