अहमदनगर: कुटुंबापासून वेगळे राहणारे, तसेच ज्यांना कुणाचा आधार नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांची लॉकडाऊनच्या काळात मोठी फरफट झाली. अगदी खाण्या-पिण्यापासून ते औषधोपचारासाठीही या ज्येष्ठांना इतरांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागले. बहुतांशी काळ घरातच थांबून राहावे लागल्याने, अनेकांना आजारही बळावल्याचे काही ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.
नगर शहर व परिसरात ज्येष्ठ नागरिकांची मोठी संख्या आहे. ज्येष्ठांचे हक्क व संरक्षणासाठी काम करणारे काही ज्येष्ठ नागरिक संघ शहरात कार्यरत आहेत. या माध्यमातून ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम राबविले जायचे. त्यामुळे चांगला विरंगुळा व्हायचा. कोरोनाच्या काळात मात्र एकत्र जमण्यास निर्बंध आल्याने ज्येष्ठांनाही घरात थांबून राहावे लागले. जे कुटुंबासमवेत राहतात, त्यांना विशेष अडचणी आल्या नाहीत. मात्र, जे ज्येष्ठ एकटे अथवा पती-पत्नी असे दोघेच राहतात, त्यांना किराणा, भाजीपाला आणणे, यांसह उपचारासाठी रुग्णालयात जाणे, अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे अशा अडचणीच्या काळात प्रशासनाने एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
-----------------
पोलीस ठाण्यात वृद्धांची नोंद नाही
ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड होऊ नये, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासून त्यांना संरक्षण मिळावे, यासाठी पोलिसांनी ज्येष्ठांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, त्यांना मदत करावी, असा नियम आहे. नगर शहरातील तोफखाना, कोतवाली व भिंगार असे तीन पोलीस स्टेशन आहेत. यातील एका पोलीस ठाण्यात त्यांच्या हद्दीत किती ज्येष्ठ नागरिक एकटे राहातात, अशी नोंद नाही.
------------------
फिरणे बंद झाले, सांधेदुखी वाढली
उतारवयात व्यायाम केला, तरच स्वास्थ्य चांगले राहते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडण्याला बंदी होती. त्यामुळे बहुतांशी ज्येष्ठ नागरिकांचे सकाळ, संध्याकाळचे फिरणे बंद झाले. त्यामुळे अनेकांना सांधेदुखी, तसेच इतर आजार सुरू झाले.
---------------
लॉकडाऊनच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांना किराणा, भाजीपाला आणण्यासाठीही लांबवर पायपीट करावी लागली. विरंगुळ्याचे नियमित उपक्रम बंद झाल्याने घरातच थांबून राहावे लागले. त्यामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या.
- शोभा ढेपे, ज्येष्ठ नागिरक
----------------
एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, अथवा ज्या ज्येष्ठांना मदतीची गरज आहे, त्यांना पोलीस मदत करतात, त्यांच्या संपर्कात राहात. सुरक्षिततेबाबत ज्या ज्येष्ठांना अडचणी आहेत, त्यांनी तोफखाना पोलिसांशी संपर्क करावा, त्याची तत्काळ दखल घेतली जाईल, तसेच ज्येष्ठांची ठाण्यात नोंदही केली जाईल.
- ज्योती गडकरी, पोलीस निरीक्षक तोफखाना पोलीस स्टेशन.