श्रीगोंदा / देवदैठण : देवदैठण (ता. श्रीगोंदा) येथील शिरूर - बेलवंडी रस्त्यालगत कुकडी कॉलनी बसथांब्याजवळ पिंपळनेर (ता. पारनेर) येथील एका व्यक्तिचा मृतदेह रविवारी (दि. ११) सकाळी आढळून आला. त्या व्यक्तीच्या डोक्यावर झालेल्या जखमेवरून गोळीबार करून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
पांडुरंग जयवंत पवार (वय ५२, रा. पिंपळनेर, ता. पारनेर) यांचा मृतदेह आढळून आला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
त्यांचा मुलगा सागर पवार याने मृतदेहाची ओळख पटविली.
पांडुरंग पवार यांचा गोळी झाडून खून करून खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह शनिवारी रात्री देवदैठण गावाजवळ तेथे टाकला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
रविवारी सकाळच्या वेळी राजेंद्र जयवंत कौठाळे, अमोल कौठाळे यांनी कुकडी कॉलनी बसथांब्याजवळ पाहिले. नंतर त्यांनी बेलवंडी पोलिसांना संपर्क केला.
पवार यांच्या कपाळावरून पाठीमागे आरपार जाणारी मोठी जखम आढळून आली. गोळीबार त्याचा करून खून केला असावा, असा संशय पोलिसांना आहे. खून कोणी? कशासाठी? कशाने? कधी? कुठे? केला हे आरोपी जेरबंद केल्यानंतरच समजणार आहे.
घटनेची माहिती समजताच अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, बेलवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपतराव शिंदे, उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, सहाय्यक फौजदार मधुकर सुरवसे, पोलीस हवालदार मारुती कोळपे, रावसाहेब शिंदे, नंदकुमार नाईक, हसन शेख, ज्ञानेश्वर पठारे, सतीश शिंदे, कैलास शिपनकर यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. नगर येथील रक्षा श्वान, फॉरेन्सिक लॅब टीम, फ्रिंगर प्रिट टीम घटनास्थळी दाखल झाली होती. त्यातून काही धागेदोरे मिळतात का ते पाहून तपासाची सूत्रे फिरविली जात आहेत.
---
११ देवदैठण
देवदैठण येथे खून झालेल्या ठिकाणाची पाहणी करताना पाेलीस अधिकारी, कर्मचारी.