लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शहरात ठिकठिकाणी बांधकामाच्या टाकाऊ साहित्याचे ढीग अस्ताव्यस्त पडलेले आहेत. त्यामुळे शहर विद्रूप झाले असून, या टाकाऊ वस्तूंचे योग्य व्यवस्थापन करण्याची मागणी हरिभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय ललवाणी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शहर व परिसरात बांधकामाच्या टाकाऊ साहित्य रस्त्याच्या बाजूला पडलेले आहे. जुने बांधकाम पाडून नवीन बांधकामे सुरू आहेत. जुने बांधकाम पाडल्यानंतर टाकाऊ साहित्य सर्रास रस्त्यावर टाकले जात आहे. याकडे शहरातील हरिभूमी प्रतिष्ठानने महापौरांचे लक्ष वेधले आहे. याबाबत प्रतिष्ठानच्या वतीने महापौर बाबासाहेब वाकळे यांना निवेदन देण्यात आले आहे. बांधकामाचे टाकाऊ साहित्य सर्रास रस्त्याच्या बाजूला, ओढ्यात, नदीपात्रात टाकण्यात येत आहे. त्यामुळे शहर विद्रूप झाले असून, या साहित्याचे योग्य व्यवस्थापन करावे. हे साहित्य संकलित करून विलगीकरण करावे. जेणे करून हे साहित्य रस्त्यावर पडणार नाही. सध्या स्वच्छ सर्वेक्षण सुरू असल्याने टाकाऊ साहित्याबाबत धोरण निश्चित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.