बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील व्यवसायाने डाॅक्टर असलेल्या एका भूमीपुत्राने रूग्णसेवेसोबतच पक्षीनिरीक्षण व छायाचित्रीकरण छंदाची जोपासना केली. भ्रमंतीतून आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेल्या अनोख्या फोटोग्राफीला सातासमुद्रापार अमेरिकेतील मासिकात झळकवत त्यांनी नुकताच जागतिक लौकिक मिळवला आहे.
बोधेगाव येथील केदारेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष डाॅ. प्रकाश गंगाधर घनवट यांचे थोरले सुपूत्र डाॅ. विक्रांत घनवट (वय ३५) हे अस्थिरोगतज्ज्ञ आहेत. त्यांनी रूग्णसेवेसोबतच आपल्या पक्षीनिरीक्षण व छायाचित्रीकरण या उपजत छंदाची जोपासना केली. यासाठी त्यांनी परिसरातील शेत-शिवार, नागलवाडी, काशीकेदारेश्वर, गोळेगाव, सालवडगाव येथील तलाव तसेच पैठण येथील जायकवाडी धरण येथे नियमित भ्रमंती करून पक्षीनिरीक्षण व वेगवेगळ्या पशू-पक्ष्यांचे छायाचित्रे कॅमेऱ्यात टिपली. बोधेगाव येथील एका केळीबागेत पानावरून घसणाऱ्या रंगबेरंगी व निरागस अशा सूर्य पक्ष्याची अचूक टिपलेली छबी अमेरिकेतील ‘दि ईपोज टाईम्स’ या मासिकात १६ जानेवारी २०२१ मध्ये नुकतीच झळकली आहे.
जायकवाडी धरणावर येणाऱ्या लोभस रूप असणाऱ्या परदेशी फ्लेमिंगो, गोल्डन डक, कदंब, राजहंस यांसह घुबड, पानकावळा, सुतार, शेकट्या, बगळा, पारवे, चिमण्या, साप, हरिण, काळवीट, असे विविध पशू-पक्षी व नैसर्गिक वनसंपदांची छायाचित्रे त्यांनी संग्रहित केली आहेत. या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन नुकतेच शेवगाव येथे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ज्ञानेश्वर कातकडे, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. रामेश्वर काटे आदींच्या हस्ते पार पडले.
यावेळी डाॅक्टर अशोसिएशन तालुकाध्यक्ष डाॅ. विकास बेडके, डाॅ. गणेश चेके, डाॅ. प्रकाश घनवट, डाॅ. गोवर्धन पवार, डाॅ. दिनेश राठी, नगरसेवक महेश फलके, डाॅ. नितीन भराट, डाॅ. दीपक वैद्य, डाॅ. अरूण भिसे, डाॅ. अनिल धस, भाऊसाहेब पोटभरे आदी उपस्थित होते.
फोटो दोन ०५ बोधेगाव आर्ट, १
अमेरिकेतील एका मासिकात नुकतेच झळकलेल्या पंचरंगी सूर्य पक्ष्याची केळीच्या पानांवरील डाॅ. विक्रांत घनवट यांनी टिपलेली मनमोहक छबी. दुसऱ्या छायाचित्रात शेवगाव येथे डाॅ. घनवट यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन पार पडले.