अविश्रांत काम करणारे राजेंद्र भोसले- यंत्रणेचा खरा प्रेरणास्रोत
------------------
ऑक्टोबर-२०२० मध्यात डॉ. राजेंद्र भोसले यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. ते आले त्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. पहिली लाट जवळपास ओसरली होती. व्यवहार अनलॉक झालेले होते. जिल्ह्यात लग्न समारंभ, सभा-समारंभ सुरू झाले होते. धार्मिक स्थळे बंद होती. मोर्चे, आंदोलने सुरू झाली होती. दसरा, दिवाळीचे सण मास्क लावूनच सुरू होते. आठ ते नऊ महिन्यांनंतर प्रशासनाचे काम कसे तरी पूर्वपदावर आले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महासप्तपदी अभियान राबवून अनेक वर्षांची हजारो प्रलंबित प्रकरणे मार्गी लावली. सुस्त प्रशासनाचा कारभार या अभियानामुळे गतिमान झाला. शासनाचे आदेश, कायदे डॉ. भोसले यांना अगदी तोंडपाठ असतात. नऊ महिन्यांनंतर कोरोनाव्यतिरिक्त वेगळे काम केल्याचे समाधान यंत्रणेला लाभले. हे काम वेगात सुरू असतानाच पुन्हा फेब्रुवारीच्या अखेरपासून दुसऱ्या लाटेची चाहूल लागली. याचवेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी रस्त्यावर उतरून मंगल कार्यालये, सार्वजनिक सभा, समारंभ बंद करून टाकली. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत बसली. लग्नातील गर्दी ओसरली. गर्दीचे कार्यक्रम बंद झाले. कोरोनाचे रुग्ण दरदिवशी दुप्पट होत गेले. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी प्रत्येक तालुक्यात जावून आढावा घेतला. यंत्रणेला सूचना केल्या. बारीकसारीक प्रश्न समजावून त्याप्रमाणे नियोजन केले. प्रत्येक तालुक्यात रस्त्यावर उतरून लोकांना अपील केले. मास्क वापरा, शारीरिक अंतर ठेवा आणि सॉनिटायझरचा वापर करा, अशी भोसले यांची लोकांना विनवणी असते. एप्रिलमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजनचा मोठा तुटवडा झाला होता. रुग्णांना हे इंजेक्शन मिळावेत म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नोडल अधिकाऱ्यांची फौज निर्माण केली. ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची टीम रात्रं-दिवस कार्यरत ठेवली. हिवरेबाजार कोरोनामुक्त झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सलग तीन दिवस ग्रामपंचायत स्तरावर व्हीडिओ कॉन्फरन्स घेऊन हिवरेबाजारचा पॅटर्न समजावून सांगितला. पद्मश्री पोपटराव पवार यांनाही सोबत घेतले. प्रत्येक गाव कोरोनामुक्त झाले पाहिजे, यासाठी रात्रं-दिवस सूचना देण्यात जिल्हाधिकारी व्यस्त राहिले. जे काही कमी पडेल, ते पुरविण्यासाठी सतत ते यंत्रणेतील प्रत्येकाशी संपर्कात असतात.
----------
जेवणही कार्यालयातच...लक्षात ठेवण्याची अनोखी शैली
दुसरी लाट भीषण होती. रुग्णांचे प्रमाण वाढले होते. मृत्युची संख्या वाढलेली होती. त्यामुळे कोरोनाला रोखणे हे मोठे आव्हान होते. अशा तणावाच्या परिस्थितीतही शांतपणे ते संकटाला तोंड देत होते. सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री दहापर्यंत जिल्हाधिकारी भोसले हे कार्यालयातच ठाण मांडून असतात. अगदी यंत्रणेच्या तळाशी त्यांचे बारीक लक्ष असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स दिवसातून अनेक वेळा होतात, तसेच जिल्ह्यातील यंत्रणेला सूचना देण्यासाठी बैठका घेणे, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेणे ही कामे नित्याची झाली आहेत. त्यातच त्यांचा बहुतांश वेळ जातो; मात्र न थकता अविश्रांत काम करीत राहतात. लॉकडाऊनच्या काळात अनेक आदेश जारी व्हायचे. त्यापूर्वी नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अनेक बैठका घ्यावा लागल्या. लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांशी सातत्याने चर्चा करावी लागली. सहकारी असलेल्या अधिकाऱ्यांशी सातत्याने बोलावे लागत होते. हा लढा सामूहिक लढण्यासाठी भोसले हे त्यात अग्रभागी आहेत. व्हिडिओद्वारे ते सातत्याने माध्यमांच्या संपर्कात राहिले. ताजी आकडेवारीही त्यांच्या अगदी तोंडपाठ असते. लक्षात ठेवण्याची अनोखी शैली त्यांच्याकडे आहे. अशा व्यस्ततेमधूनही ते कुटुंबाला वेळ देतात. देश-विदेशातील घडामोडी जाणून घेण्यासाठी बातम्या पाहतात. वेळ मिळाला तर एखादे पुस्तकही वाचतात. दिवसभर कामाच्या व्यस्ततेमुळे निवासस्थानी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे कार्यालयातच ते डबा मागवून जेवण करतात. अभ्यागतांचे म्हणणे तेवढेच शांततेने ऐकून घेतात. अधिकारी, कर्मचाऱ्यांशी त्यांचा संवाद-संपर्क रात्रं-दिवस सुरूच असतो. कोणाचाही फोन आला तरी त्याला ते प्रतिसाद देतात. त्यामुळे कोरोनामुक्तीचा ध्यास घेताना २४ तास ते जनसेवेत आहेत. म्हणून अशा जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुकाची थाप दिली, ते अगदी योग्यच ठरले. जिल्हाधिकारी भोसले यांनी आखलेल्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या निम्म्यावर येण्यास व मृत्युचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. प्रत्येक तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी भोसले यांचा पाठपुरावा व प्रेरणा हीच यंत्रणेची मोठी ताकद ठरली आहे.