शिर्डी : द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी साईबाबांविषयी केलेल्या वक्तव्यावरुन देशभर वादंग उठलेले असताना शिर्डीकरांनी मात्र बाबांच्या श्रद्धा व सबुरीच्या शिकवणुकीवर विश्वास ठेवत या प्रकरणी यापुढे कोणतेही आंदोलन न करण्याचा तसेच यावर प्रतिक्रिया न देण्याचा निर्णय घेतला आहे़गेल्या काही दिवसांपासून शंकराचार्यांनी केलेल्या वक्तव्याने साईभक्तांमध्ये तीव्र नाराजी आहे़ याचे प्रतिसादही देशभरात उमटले़ त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सर्वपक्षीय शिर्डीकरांनी साईमंदिरालगतच्या मैदानात संत दासगणू लिखित साईस्तवन मंजिरीचे सामुदायिक पठण केले़ या कार्यक्रमाचे पौरोहित्य बाळासाहेब जोशी यांनी केले़ यानंतर शिर्डीचे ग्रामजोशी वैभव रत्नपारखी यांनी साईसच्चरित्रातील वचनांवर श्रद्धा ठेवत साईभक्तांमध्ये संभ्रम करणाऱ्या या आंदोलनाला पूर्णविराम देण्यासाठी या पुढे या प्रकरणी कोणतेही आंदोलन न करण्याचा व प्रतिकार न करण्याचा ठराव मांडला़ ग्रामस्थांनी हात उंचावून या ठरावाला संमती दिली़ यानंतर वैभव रत्नपारखी यांनी प्रसार माध्यमांच्याद्वारे देशभरातील भाविकांना यासाठी आवाहन केले़ यावेळी कैलास कोते, कमलाकर कोते, विजय कोते, बाबुराव पुरोहित, दिलीप संकलेचा, सचिन तांबे, शिवाजी गोंदकर, तुकाराम गोंदकर, अभय शेळके, सचिन शिंदे, अनिल शेजवळ, गोपीनाथ गोंदकर, दत्तात्रय कोते, रवींद्र गोंदकर, वैभव कोते, सचिन चौघुले, जगन्नाथ गोंदकर, ताराचंद कोते, राजेंद्र गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर उपस्थित होते़ (तालुका प्रतिनिधी)
शंकराचार्यांच्या विरोधातील आंदोलनाला पूर्णविराम
By admin | Updated: July 4, 2014 01:21 IST