तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील महसुलीदृष्ट्या सर्वाधिक मोठ्या बाजारपेठेसह लोकसंख्येच्या दृष्टीनेही क्रमांक दोनचे शहर म्हणून तिसगावची ओळख आहे. येथील बेशिस्त वाहतुकीने अलीकडील काळात अक्षरशः कळस गाठला आहे.
महामार्गावरील खड्ड्यांची मालिका, वीजवाहतूक तारांना चुकवित संथगतीने चालणारी ऊस वाहतुकीची वाहने, दुभाजकांच्या अभावाने होणारी दुचाकींची रस्ता दुतर्फा लागणारी रांग यात अधिक भर घालत आहे. आठवडे बाजार वगळता वाहतूक पोलिसांचा असणारा अभाव याला सर्वाधिक भर घालणारा ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांतून केला जात आहे. तिसगाव मुख्य बसस्थानकाच्या पुढे पूर्वेला पाथर्डीकडे जाणाऱ्या महामार्गालगत तळीरामांचा वावर वाहनधारकांची डोकेदुखी ठरत आहे. गुरुवारी आठवडे बाजाराच्या निमित्त शासकीय विश्रामगृहाच्या परिसरातही तळीरामांचा वावर बाजाकरूंना त्रासदायक ठरत असल्याच्या तक्रारी आहेत.
ऐतिहासिक वेशीजवळील पूल ते वनविभाग कार्यालयापर्यंत महामार्गाच्या मधोमध सोडलेल्या दुभाजक कामासाठीच्या चरांमुळे अनेकदा रस्ता ओलांडताना दुचाकीस्वार घसरून पडतात. नगर रस्त्याने भरधाव जाणाऱ्या चारचाकी वाहनांच्या वर्दळीतून वृद्धेश्वर हायस्कूलचे शालेय विद्यार्थी सकाळी व सायंकाळी मार्गस्थ होतात. परिवहनच्या बसेस नेमक्या याच वर्दळीमुळे वृद्धेश्वर चौक सोडून पुढे मागे थांबतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या त्रासात अधिक भर पडत असल्याचे चित्र आहे.
पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार लोखंडे यांनी अनेकदा मध्यस्थी केल्याने अनेक वादांचे प्रसंग टळले. तिसगाव शहरातील तीन किलोमीटर लांबीचा रस्ता खड्डेमय आहे. लोंबकळणाऱ्या वीजवाहक तारा, वाकलेले विजेचे खांब मोठी दुर्घटना घडण्याअगोदर दुरुस्त होणार का? असा सवाल उपसरपंच फिरोज पठाण यांनी केला आहे.
फोटो : १७ तिसगाव ट्रॅफिक
तिसगाव शहरात झालेली वाहतूककोंडी.