अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर शहर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अनुकूल भूमिका घेतली आहे. परंतु जागा अदलाबदलीचा निर्णय दोन्ही पक्षातील नेत्यांच्या संमतीनंतरच होईल, असे मतही त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत मांडले. नगर शहर मतदारसंघाची जागा कॉँग्रेसकडे असून राष्ट्रवादीकडून जागेवर दावा सांगितला जात आहे. या संदर्भात पवार यांचा विचारले असता ते म्हणाले, जागा अदलाबदलीचा निर्णय दोन्ही पक्षातील नेत्यांच्या संमतीनंतरच घेतला जातो. जेथे त्यांचा चांगला उमेदवार असतो तेथे आम्ही जागा सोडतो, जेथे आमचा असेल तेथे ते सोडतात. नगर शहर मतदारसंघात आमचा उमेदवार त्यांच्याकडील इच्छुकांपेक्षा उजवा आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला मिळाली तर चांगले होईल असे सांगत पवार यांनी या जागेच्या अदलाबदलीसाठी अनुकूल भूमिका मांडली. नगर शहर मतदारसंघातून महापौर संग्राम जगताप हे निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे. मात्र ही जागा कॉँग्रेसच्या वाट्याला असल्याने जागेची अदलाबदल झाली तरच त्यांना निवडणूक लढविणे शक्य आहे. कॉँग्रेसकडून युवक कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांची नावे चर्चेत आहेत. पवार यांच्या माहितीनंतर नगरची जागा अदलाबदल होण्याची चर्चा पुन्हा जोर धरु लागली आहे. (प्रतिनिधी)
नगरच्या जागेवर पवारांचाही डोळा
By admin | Updated: July 5, 2014 00:28 IST