अहमदनगर : नगर तालुक्यातील पांगरमल येथे सेना उमेदवारांनी दिलेल्या पार्टीत विषबाधा झालेल्या १२ जणांची मृत्यूशी झुंज सुरू आहे़ रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांच्या कुटुंबीयांकडे पैसे नसल्याने गावात वर्गणी काढून रुग्णालयाचे बिल भरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे़ बिलाचे पैसे भरल्यानंतरच रुग्णालय नातेवाइकांकडे मृतदेह देत असल्याने हातावर पोट असलेल्या या कुटुंबाची मोठी अडचण निर्माण झाली आहे़ पार्टीत विषबाधा झालेल्या सहदेव आव्हाड यांचा गुरुवारी उपचारादरम्यान शहरातील सिटी केअर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला़ डॉक्टरांनी त्यांना ६२ हजार रुपयांचे बिल दिले़ आव्हाड यांच्या कुटुंबीयांकडे तेवढे पैसे नसल्याने पांगरमल येथे वर्गणी काढून हॉस्पिटलचे बिल भरण्यात आले़ दारूतून विषबाधा झालेल्यांमध्ये शहरासह पुणे येथील खासगी रुग्णालयात १२ जण उपचार घेत आहेत़ उपचारादरम्यान दररोज ६ ते ७ हजार रुपयांचा खर्च येत आहे़ हे रुग्ण सामान्य कुटुंबातील असल्याने पैशासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)दारूतून विषबाधा झालेले सर्वसामान्य कुटुंबातील आहेत़ प्रशासनाकडून अथवा राजकीय नेत्यांकडून त्यांना आर्थिक मदत मिळालेली नाही़ - बापूसाहेब आव्हाड, सरपंच, पांगरमलरुग्णालयात ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांना दररोज पैशाची गरज भासत आहे़ अनेकांचे बिल ५० हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत गेले आहे़ गावात वर्गणी काढून पैसे जमा करत आहोत़ - देवीदास आव्हाड, उपसरपंच, पांगरमलआरोपी मोकाट पांगरमल येथील दारूकांडप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगल आव्हाड, भाग्यश्री मोकाटे, गोविंद मोकाटे़, भीमराज गेणू आव्हाड, रावसाहेब गेणू आव्हाड, महादेव किसन आव्हाड यांच्यावर कलम ३०४, ३२८, ३४प्रमाणे गुन्हा दाखल आहे़ यापैकी सेनेचा उपजिल्हाप्रमुख असलेल्या भीमराज आव्हाड यालाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ उर्वरित आरोपी अजूनही मोकाट आहेत़
रुग्णांच्या उपचारासाठी लोकवर्गणी
By admin | Updated: February 18, 2017 04:20 IST