श्रीगोंदा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सामाजिक जाणिवेतून १५ कोविड सेंटर सुरू करून ३ हजार १६८ कोरोना बाधित रुग्णांना जीवदान देणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील कोविड सेंटर व स्वंयसेविकांचा सन्मान प्रशासकीय अधिकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. हा सामाजिक उपक्रम अग्निपंख फाउंडेशनने शुक्रवारी राबविला.
आरोग्य विभागाचा अजेंडा घराघरात पोहोचविणाऱ्या आरोग्यसेविकांच्या प्रतिनिधी म्हणून स्नेहल सोनटक्के, दीपाली शेलार, सुनंदा थोरात, गीता राऊत, नीता शिंदे, सुरेखा चितळकर यांच्या हस्ते येथे उपस्थित अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव म्हणाले, माझ्या जीवनात मोठ्या माणसांकडून अनेक सत्कार झाले. मात्र आरोग्य विभागात अतिशय प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य सेविकांच्या हस्ते होणारा सन्मान आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे.
यावेळी तहसीलदार प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, संपतराव शिंदे, पालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा, हेमंत नलगे, सुनील गायकवाड, प्रमोद म्हस्के यांची भाषणे झाली.
प्रास्ताविक प्रा. फुलसिंग मांडे यांनी केले.
यावेळी गटविकास अधिकारी प्रशांत काळे, अप्पर तहसीलदार चारुशिला पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी नितीन खामकर, नागवडे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष युवराज चितळकर, योगेश भोयटे, सतीश मखरे, कल्याणी लोखंडे, दिलीप काटे, अंजली बगाडे, शिवदास शिंदे, मधुकर काळाणे, बी. बी. गोरे, किसन वऱ्हाडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विशाल चव्हाण यांनी केले.
---
१८ अग्निपंख
श्रीगोंदा येथील कार्यक्रमात कोळगाव येथील स्वयंसेविकांचा सन्मान करताना पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, मुख्याधिकारी मंगेश देवरे, तालुका वैद्यकीय अधिकारी नितीन खामकर व इतर.