जामखेड : पवार कुटुंबावर टीका करण्यासाठीच गोपीचंद पडळकर यांना भाजपने आमदारकी दिली आहे, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली. पडळकर यांनी जामखेड तालुक्यातील दौऱ्यावेळी केलेल्या टीकेला पवारांनी शुक्रवारी प्रत्युत्तर दिले.
पडळकरांनी गुरुवारी जामखेड तालुक्यातील विविध गावांमध्ये विविध प्रश्न जाणून घेण्यासाठी घाेंगडी बैठका घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत रोहित पवार यांच्यासह शरद पवार यांच्यावरही टीका केली होती. रोहित पवार यांनी उठसूट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करू नये. त्यांनी स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे. आमदार झाल्यापासून त्यांना स्वयंघोषित मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटते. ते पोस्टरबॉय असून केवळ सोशल मीडियावर सक्रिय आहेत, अशी टीका पडळकर यांनी केली होती.
शुक्रवारी रोहित पवार हे कर्जत येथे एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी पत्रकारांनी पडळकर यांनी केलेल्या टीकेबाबत छेडले असता रोहित पवार म्हणाले, भाजपने गोपीचंद पडळकर यांना ज्यासाठी आमदार केले ती जबाबदारी ते उत्तमरित्या पार पाडत आहेत. आतापर्यंतचा त्यांचा इतिहास पाहिला तर ते जेथे जातात तेथे केवळ टीकाच करतात. त्यातही पवार कुटुंबावर ते जास्त टीका करतात. पवार कुटुंबावर जास्तीत जास्त टीका करण्यासाठीच भाजपने त्यांना आमदारकी दिली आहे, अशी टीका पवार यांनी केली.