लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हार : कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची मुदत संपल्याने दोन महिन्यांत नवीन विश्वस्तांची निवड व नियुक्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अहमदनगरच्या सहायक धर्मादाय आयुक्तांना दिले आहेत. विश्वस्त मंडळाची मुदत संपल्यामुळे नवीन विश्वस्तांची नेमणूक करण्याबाबतची याचिका, तसेच ट्रस्ट संदर्भातील अन्य याचिका व अर्जांची एकत्रितपणे सुनावणी औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांच्यासमोर झाली. त्यावर निकाल देताना कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टवर दोन महिन्यांत नवीन विश्वस्तांची निवड व नियुक्ती करण्याचे आदेश सहायक धमार्दाय आयुक्तांना दिले. तसेच नवीन विश्वस्त मंडळातील विश्वस्तांची संख्या ११ ऐवजी १५ करण्यात यावी. त्यापैकी ८ विश्वस्त कोल्हार बुद्रुकचे, तर ७ विश्वस्त भगवतीपूर गावचे असतील. तसेच नवनियुक्त विश्वस्त मंडळाच्या पहिल्या बैठकीत बहुमताने अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व खजिनदार यांची निवड करण्यात यावी, असेही निर्देश देण्यात आले. नवीन विश्वस्त मंडळाची नेमणूक होईपर्यंत विद्यमान मंडळ कामकाज पाहणार आहे.कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टसंदर्भात, तसेच मुदत संपल्यामुळे ट्रस्ट बरखास्त करण्याबाबत ग्रामस्थांनी वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या. परंतु सन २००३ मधील अपील प्रलंबित असल्याने निकाल होत नव्हता. दरम्यान याचिकाकर्त्यांमध्ये चर्चेद्वारे तडजोड झाली. न्यायालयात सर्व याचिका व अर्जांची एकत्रितपणे सुनावणी होऊन त्या निकाली काढण्यात आल्या. .............. ना. राधाकृष्ण विखे यांच्या आवाहनानुसार कोल्हार व भगवतीपूर गावातील सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी याचिकाकर्ते आणि दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी सामंजस्यपूर्ण व सहमतीने तडजोड केली आणि ट्रस्ट संदर्भातील दाखल याचिका मागे घेण्यात आल्या. त्यामुळे नवीन विश्वस्त मंडळ निवडीचा मार्ग प्रशस्त झाला असल्याची प्रतिक्रिया विखे कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाचे सल्लागार डॉ. भास्करराव खर्डे यांनी व्यक्त केली.
कोल्हार भगवतीपूर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त निवडीचे आदेश
By admin | Updated: June 30, 2017 15:45 IST