शहरातील प्रोफेसर कॉलनी येथील रेणुकामाता मंदिराजवळ पायी जाणाऱ्या वैशाली विलास देशपांडे (वय ६० रा.प्रोफेसर कॉलनी) यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्याने हिसकावून नेले. शनिवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली. दरम्यान, शुक्रवारी पाइपलाइन रोड परिसरात चोरट्यांनी धूमस्टाईलने दोन महिलांचे दागिने ओरबाडून नेले. त्यानंतर, सायंकाळी सव्वापाच वाजता शहरातील सिव्हिल हडको परिसरातील निसार हॉस्पिटलजवळ सुमन सुरेश कुलकर्णी (वय ६७) या वृद्ध महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ओरबाडून नेले. विशेष म्हणजे, या चारही घटना भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी घडल्या आहेत. चोरट्यांच्या भीतीने घराबाहेर पडतानाही महिलांना भीती वाटत आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना अपयश येत आहे.
----------------------------------------------------------------------------------
ना चोरट्यांचा बंदोबस्त ना अवैध व्यवसायांना पायबंद
नगर शहरात चोऱ्या, घरफोडीच्या घटना सुरू असताना, अवैध व्यवसायांचाही सुळसुळाट झाला आहे. जुगार, मटका अड्डे, अवैध दारूविक्री सर्वत्र विनादिक्कत सुरू आहे. रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थ विकणाऱ्या स्टॅालवर बसून तळीराम रात्री उशिरापर्यंत दारू रिचवतात. लॉकडाऊन काळात बंद झालेले मटका आणि जुगार अड्डे चांगल्याच जोमाने सुरू झाले आहेत. पोलिसांचे मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.