केडगाव : अरणगावमधील गट नं. ८५ मधील काही क्षेत्र परस्पर बुरुडगाव (ता.नगर) येथील महानुभव आश्रमाच्या स्मशानभूमीसाठी देण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा न करताच काढला. या निर्णयाला अरणगाव येथील ग्रामस्थांनी जाहीर निषेध करत स्मशानभूमीसाठी जागा देण्यास तीव्र विरोध केला आहे.
याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी सरदिल यांना देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. योग्य ती चौकशी करून कारवाई होईल, असे आश्वासन निचित यांनी दिले. हे क्षेत्र पूर्णपणे गायरान आरक्षित आहे. शेजारी लोकवस्ती आहे व शेतकरी शेती कसून उदरनिर्वाह चालवित आहेत. महानुभव आश्रम व अरणगाव ग्रामपंचायत यांचा काहीही संबंध नाही, तरीही प्रशासकीय पातळीवर घेतलेला हा निर्णय अरणगाव ग्रामस्थांसाठी पूर्णपणे अन्यायकारक आहे. हा आश्रम बुरुडगावहद्दीत असून, त्यांचा महसूल कर त्या ग्रामपंचायतीस जमा होतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या स्मशानभूमीसाठी बुरुडगाव हद्दीत जागा देऊन व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
निवेदनाची योग्य दखल न घेतल्यास आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सरपंच स्वाती मोहन गहिले, उपसरपंच लता रंगनाथ शिंदे, महेश पवार, बबन करांडे, रंगनाथ शिंदे, सुभाष पुंड, गौतम जाधव, प्रशांत गहिले, राजेश कांबळे, मोहन गहिले, सूर्यभान जाधव, ग्राम विकास अधिकारी रासकर आदी उपस्थित होते.