याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी फिर्याद दाखल केली आहे. सध्या कोरोना रुग्णांची झपाट्याने संख्या वाढत असून रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर आर्थिक फसवणुकीच्या उद्देशाने रेमडेसिविर इंजेक्शन देण्याचे आमिष दाखविले जात आहे. पैसे भरण्यासाठी एक खाते क्रमांकही दिला जात आहे. अशाच स्वरूपाचा मेसेज सुवेंद्र गांधी यांच्या कार्यकर्त्यांना आला होता. अशा मेसेजच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होऊ नये, यासाठी गांधी यांनी ही बाब जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना सांगितली. याबाबत अधीक्षक पाटील यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, रेमडेसिविर इंजेक्शनबाबत अशा प्रकारचा मेसेज आला तर कुठल्याही खाते क्रमांकावर पैसे टाकू नयेत, असे आवाहन सायबर पोलिसांच्या वतीने उपनिरीक्षक प्रतीक कोळी यांनी केले आहे.
रेमडेसिविर इंजेक्शन देण्याचे ऑनलाइन आमिष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:21 IST