कोतूळ : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांची गुरुवारी शिर्डी येथे बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती कांदा व्यापारी व उत्पादक संघटनेचे सीताराम पाटील देशमुख यांनी दिली.शिर्डी येशील शासकीय विश्रामगृहावर सकाळी ११ वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला कोल्हापूर, सातारा, पुणे, धुळे, नाशिक, जळगाव, नगर, औरंगाबाद अशा विविध भागातून कांदा उत्पादक व कांदा व्यापारी उपस्थित राहणार आहेत एप्रिल २०१६ ते जुलै २०१६ या कालावधीत राज्यातील अनेक कांदा व्यापारी व उत्पादकांनी केरल राज्यातील पी.पी.एच.ट्रेडर्स, सी.ई.ब्रदर्स ,अल्मास ट्रेडिंग कंपनी. अशा व्यापाऱ्यांना महाराष्ट्रातून कांदा खरेदी करून पाठविला. सुरवातीला जादा भावाचे आमिष दाखवून व्यापारी व शेतकरी आपलेसे केले. त्या नंतर या व्यापाऱ्यांनी अनेकाना गंडा घालून मालाचे पैसे दिले नाही. महाराष्ट्रातील व्यापाऱ्याची काही कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत पुढील कायर्वाही साठी आंदोलनाची दिशा ठरवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात येणार आहे. यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक झाली असेल, अशा व्यापारी शेतकऱ्यांंनी या बैठकीसाठी उपस्थित रहावे,असे आवाहन अतुल कांडगे (चाकण), महेंद्र सुराणा( पुणे), बबन घुले घुले (अहमदनगर), संतोष थोरात ( मंचर ), चंद्रकांत देशमुख , संतोष आरोटे, (अहमदनगर) यांनी केले आहे. (वार्ताहर)
कांदा व्यापाऱ्यांची उद्या शिर्डीत बैठक
By admin | Updated: September 27, 2016 23:52 IST