तोफखाना पोलीस ठाण्यात शनिवारी सकाळी १०.३०वाजता ही घटना घडली. साहेबराव शंकर काते (वय ४९, रा. लालटाकी, अहमदनगर), असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी काते यांच्या फिर्यादीवरून राजू मुरलीधर काळोखे (रा. लालटाकी) याच्या विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काते व काळोखे यांनी एकमेकांविरोधात दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने या दोघांना शनिवारी सकाळी प्रतिबंधात्मक कारवाईसाठी तोफखाना पोलीस ठाण्यात बोलाविले होते. यावेळी काळोखे याने काते यांना शिवीगाळ केल्याने ते पोलीस ठाण्यातील बाथरूमजवळ असलेल्या बाकावर जाऊन बसले होते. यावेळी तेथे काळोखे गेला. उसने घेतलेल्या पैशावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. यावेळी काते यांनी काळोखे याला उसने दिलेले पैसे परत मागितले, तेव्हा त्याने ब्लेडने काते यांच्या गळ्यावर वार केला. त्यांनी तो वार हाताने अडविला. तेव्हा त्यांच्या डाव्या हाताच्या पंजावर अंगठ्याजवळ जखम झाली. यावेळी पोलिसांनी दोघांमधील वाद सोडून काळोखे याला ताब्यात घेतले. याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पिंगळे हे पुढील तपास करत आहेत.
पैशाच्या वादातून पोलिसांसमोरच एकावर ब्लेडने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:21 IST