ऑनलाइन लोकमत
पाथर्डी, दि.03 - बारावी परीक्षेत मराठीचा विषयाच्या पेपरला आदर्श माध्यमिक विद्यालयात कॉपी पुरवणाऱ्या संदिप अशोक नितनाथ यास न्यायालयाने एक हजार दंड व कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावलीे. बारावी परीक्षेतील कॉपी प्रकरण चांगलेच गाजत असतानाच गुरुवारी शहरातील दोन परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले होते़ मराठी विषयाच्या पेपरला आदर्श माध्यमिक विद्यालयात संदिप अशोक नितनाथ (रा.नेवासा रोड,शेवगाव) यास पोलिस कर्मचारी राहुल खेडकर यांनी परीक्षा केंद्रात कॉपी देताना रंगेहात पकडले होते. आरोपीस अटक करून गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार बाबासाहेब भोसले यांनी केला़ शुक्रवारी आरोपीस न्यायालयात सादर करण्यात आले़ आरोपी संदीप अशोक नितनाथ यास दुपारी न्यायालयात आणले असता आरोपीस गुन्हा कबूल आहे का अशी न्यायाधीश विक्रमसिह भंडारी यांनी विचारणा केली़ आरोपीने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली़ त्यामुळे न्यायालयाने संदीप नितनाथ यास एक हजार रुपये दंड व कोर्ट उठेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा दिली़ यामुळे कॉपी करणाऱ्या व पुरवणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.