अहमदनगर : लपवून ठेवलेला मोबाईल परत दिला नाही म्हणून संतापाच्या भरात वैदुवाडीमध्ये एका अल्पवयीन मुलाने आपल्या मेव्हण्याचा शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मेव्हुण्याचा मृतदेह कुष्ठधाम रोडवरील कचरा कुंडीजवळ ओढत नेत असताना दोघांनी त्याला पाहिले. साक्षीदाराने मोबाईलवरून माहिती देताच तोफखाना पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने आरोपीला जेरबंद करण्यात यश आले. मोहम्मद रहेमान शेख (वय ३६, रा. घोडेगाव, ता. नेवासा) असे मयताचे नाव आहे.या प्रकरणी मयताचे वडील रहेमान यासिन शेख (वय ५०, रा. घोडेगाव, कृष्णानगर झोपडपट्टी, ता. नेवासा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलिसांनी अल्पवयीन आरोपीवर खुनाचा आणि खून करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात येणार आहे. मयत मोहम्मद शेख हा अनेक वर्षांपासून एका महिलेबरोबर वैदुवाडी येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. त्या महिलेला तीन अपत्ये आहेत. या महिलेचा भाऊ हा अल्पवयीन असून शुक्रवारी रात्री तो वैदुवाडीत बहिणीला भेटण्यासाठी आला होता. यावेळी शेख याने आरोपीचा मोबाईल घेतला व लपवून ठेवला होता. तो मोबाईल शेख याने परत केला नाही म्हणून आरोपीला राग आला. त्याने लाथाबुक्क्याने शेख याला मारहाण केली. शेख याच्या कानशिलावर व डोक्याने नाकावर जोरदार ठोसे लावले. यातच शेख याचा मृत्यु झाला. पुरावा नष्ट करण्याच्या हेतुने कुष्ठधाम रोडच्या कडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ प्रेत नेऊन टाकत असताना त्याला दोघांनी पाहिले. त्यांनी तातडीने तोफखाना पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. साक्षीदारांमुळे आरोपी पकडला अन्यथा आरोपीनेच मेव्हण्याचा खून झाल्याची फिर्याद दिली असती आणि तपासाची दिशा बदलली असती. मात्र साक्षीदारांमुळे आरोपी लवकर जेरबंद झाला, असे तोफखाना पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)घटनास्थळी सापडला सूरा कुष्ठधाम रोड येथे जेथे प्रेत नेऊन टाकण्यात येत होते, त्या ठिकाणी पोलिसांना एक मोठा सुरा सापडला. हा सुरा मयताचा होता, आपला नव्हता, असे आरोपीने पोलिसांना सांगितले आहे. नक्की कोणाचा सुरा होता, हे तपासात निष्पन्न होईल. हा खून मोबाईल लपवून ठेवला आणि दिला नाही, यामुळे झालेल्या भांडणातून झाला आहे. आरोपी हा मयताचा सख्खा मेव्हणा नसल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.गुन्हेगारी पार्श्वभूमीमयत आणि आरोपी यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. चोपडा येथे झालेल्या एका गुन्ह्यातही मयताच्या एका नातेवाईकाचा संबंध आहे. घटनास्थळी सापडलेला सुरा हा नक्की कोणाचा, आणखी त्यांच्याकडे शस्त्रे आहेत काय, गावठ्ठी कट्टे विक्री प्रकरणात त्यांचे काही संबंध आहेत काय ? या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यामुळे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
वैैदुवाडीत एकाचा खून
By admin | Updated: June 8, 2014 00:35 IST