अहमदनगर: अमृत भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराकडून रस्ते दुरुस्त करून घेण्याबाबत काय धोरण ठरले, असा सवाल करत स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी खड्ड्यांवरून अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले, तसेच याबाबत स्वतंत्र बैठक घेण्याचा आदेश घुले यांनी दिला.
सभापती अविनाश घुले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सोमवारी ऑनलाइन सभा झाली. सभेला अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, प्रभारी शहर अभियंता सुरेश इथापे, पाणीपुरवठा विभागप्रमुख रोहिदास सातपुते आदी उपस्थित होते. रस्त्यांची पॅचिंग करण्याचा विषय सभेसमोर होता. अमृत भुयारी गटार योजनेचे पाइप टाकण्यासाठी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. पाइप टाकून झाल्यानंतर रस्ते दुरुस्त करून देणे ठेकेदारावर बंधनकारक आहे, परंतु ठेकेदाराने उप ठेकेदार नेमलेले आहेत. ते रस्ते दुरुस्त करत नाहीत, अशी तक्रार माजी सभापती मुद्दसर शेख यांनी केली. यावर अमृत योजनेच्या ठेकेदाराने खोदलेल्या अनेक रस्त्यांची कामे मंजूर आहेत, परंतु अमृतच्या ठेकेदाराकडून जोपर्यंत दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत नवीन रस्त्यांची कामे ठेकेदार करणार नाहीत. याबाबत काय धोरण ठरविले, असा सवाल उपस्थित करत, सभापती घुले यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मोघम उत्तर देऊ नका, तुमच्या भोंगळ कारभारामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अमृत योजनेच्या ठेकेदाराला नोटीस बजावण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत झाला होता. त्यावर प्रशासनाने काय कार्यवाही केली, असा प्रश्न सदस्यांकडून उपस्थित केला गेला. त्यावर ठेकेदाराला नोटीस बजावलेली आहे, तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीबाबतही ठेकेदाराला कळविण्यात आल्याचा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला.
महापालिकेकडून खड्डे बुजविण्यासाठी निविदा मागविण्यात आली आहे, परंतु प्रभागातील एक किंवा दोनच रस्त्यातील खड्डे बुजविले जातात. उर्वरित खड्डे बुजविले जात नाही. किमान वर्दळीच्या रस्त्यांची तरी दुरुस्ती करावी, अशी मागणी सदस्य सागर बोरुडे यांनी केली. त्यावर भुयारी गटार, केबल, फेज-२ यामुळे रस्त्यांमध्ये मोठे खड्डे पडलेले आहेत. प्रभागातील सर्वच रस्ते दुरुस्त करणे शक्य नाही. कारण त्यासाठी मोठा निधी लागेल. खड्डे बुजविणे हा पर्याय नाही. ती तात्पुरती मलमपट्टी आहे. रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झाल्यास रस्त्यांची कामे करता येतील, असे शहर अभियंता सुरेश इथापे यांनी सांगितले. हाच मुद्दा पुढे करत शहरातील रस्त्यांची कामे मंजूर आहेत, परंतु अमृत भुयारी गटार योजनेमुळे रस्त्यांची काम थांबलेली आहेत. याबाबत स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे घुले यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य रवींद्र बारस्कर, श्याम नळकांडे आदी सदस्यांनी सहभाग घेतला.
.....
समिती स्थापनेची भाजपची मागणी फेटाळली
सावेडी भुयारी गटार योजनेच्या प्रस्तावाला गती देण्यासाठी सदस्यांची एक समिती स्थापन करावी, अशी मागणी भाजपाचे सदस्य रवींद्र बारस्कर यांनी केली होती, परंतु सभापती घुले यांनी ही मागणी फेटाळली, तसेच भाजपचे केंद्रात सरकार आहे. केंद्र सरकारकडे भाजपच्या सदस्यांनी पाठपुरावा करावा. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. राज्य सरकारकडे आम्ही प्रयत्न करू, असे घुले यांनी यावेळी सांगितले.
....
अनधिकृत नळ नियमित करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत
अनधिकृत नळ नियमित करून घेण्यासाठी डिसेंबरपर्यंत मुदत दिली जाणार आहे. पुढील सहा महिन्यांत नागरिकांनी स्वत:हून नळ नियमित करून घ्यावेत, अन्यथा प्रत्यक्ष पाहणी करून गुन्हे दाखल करणार असल्याचे प्रशासनाने सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रशासनाला उत्तर देताना सांगितले.
...