वसई : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.जे. भारुका यांनी चंद्रकांत कदम या आरोपीला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. २०१४ मध्ये नालासोपाऱ्यातील मोरेगाव भागात ही घटना घडली होती.मोरेगाव येथे आरोपी व पीडित अल्पवयीन मुलगी एकाच इमारतीत राहत होते. दोघेही एकाच ठिकाणी राहत असल्याने त्यांच्यात चांगला सुसंवाद होता. २१ जून २०१४ रोजी रात्री ८ वाजता पीडित मुलगी ही तिच्या लहान बहिणीसह घरी टीव्ही पाहत बसली होती. या वेळी आरोपी तिच्या शेजारी बसून टीव्ही पाहू लागला. काही वेळानंतर पीडित अल्पवयीन मुलगी स्वयंपाकघरात काही कामानिमित्त गेली असता आरोपी चंद्रकांत कदम तिच्यामागोमाग स्वयंपाकघरात गेला व पीडित मुलीशी अश्लील वर्तन करू लागला. या वेळी मुलीने आरडाओरडा सुरू केला असता तिची लहान बहीणदेखील स्वयंपाकघरात आली व तीदेखील मदतीसाठी धावा करू लागली. पीडित मुलीकडून झालेला प्रतिकार पाहून आरोपी चंद्रकात कदम याने मुलीला मारण्याची धमकी दिली व घटनास्थळावरून पळ काढला.याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी चंद्रकांत कदम याला अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले. या प्रकरणी तपास अधिकारी कळंत्रे यांनी केलेल्या तपासाच्या आधारावर सरकारी वकील मोहोळकर यांनी पीडित मुलीची बाजू मांडली. न्यायालयासमोर सादर केलेले साक्षी-पुरावे आणि जबानीनंतर न्यायाधीश भारुका यांनी आरोपी चंद्रकांत कदम याला तीन वर्षे कारावास व एक हजार दंडाची शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)
अधिकारी भागवतोय वन्य प्राण्यांची तहान
By admin | Updated: March 19, 2016 00:08 IST