अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीनंतर नंतर सर्वांना विषय समितीच्या सभापतींच्या निवडीच्या सभेचे वेध आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या वेळी फुटीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या आघाडीसमोर विषय समितीच्या सभापतीच्यावेळी एकसंध राहण्याचे आवाहन आहे. काँग्रेसपेक्षा गट नोंदणी झालेल्या राष्ट्रवादीत बंडखोरीची चिन्हे अधिक असल्याने या निवडी निर्विघ्न पार पडतील की नाही, याची याची खात्री कोणालाच नाही.विधानसभेच्या तोंडावर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत विरोधकांपेक्षा आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादीत अधिक राजकारण झाले. अध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या राष्ट्रवादीतील सदस्यांनी थेट पक्षश्रेष्ठींना आव्हान दिले. तर काहींनी त्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीला या निवडी अविरोध करून घेण्यात यश आले. मात्र, बंडखोरीचा धोका दोन्ही पक्षांना सभापती पदाच्या निवडीत होवू शकतो. त्यापार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाकडून सावध भूमिका घेण्यात येत आहे.दरम्यान, अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या वाटणीनंतर आता दोन्ही काँगे्रसमध्ये सभापती पदावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने त्यांच्या वाट्याला आलेले उपाध्यक्ष पद श्रीगोंदा तालुक्याला दिले आहे. विधानसभा निवडणुकीत येथील उमेदवारी राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेली आहे. यामुळे काँग्रेसच्या पदाचा फायदा राष्ट्रवादीला होणार आहे. यामुळे सभापती निवडीत राष्ट्रवादीने आता काँग्रेसला झुकते माप देण्याची मागणी होत आहे.४ आॅक्टोबरला सभापती पदासाठी विशेष सभेचे आयोजन केले असून त्यावेळी समाज कल्याण, महिला बालकल्याण आणि दोन विषय समित्यांच्या सभापतीची निवड होणार आहे. यावेळी गरज पडल्यास मतदानही होईल. या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी काम पाहणार आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीप्रमाणे सकाळी ११ वाजता इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरावा लागणार असून त्यानंतर छाननी, माघार आणि गरज पडल्यास मतदान प्रक्रिया होणार आहे. या ठिकाणी चारही सभापतींच्या निवडी होणार असून त्यानंतर कोणत्या सभापतीला कोणती विषय समिती द्यायची, यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेत निर्णय घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
सभापती निवडीसाठी ४ आॅक्टोबरला सभा
By admin | Updated: September 23, 2014 23:03 IST