अहमदनगर : अमृत भुयारी गटार योजनेचे पाइप टाकण्यासाठी मध्यवर्ती शहरातील बहुतांश रस्ते खोदण्यात आलेले आहेत. हे रस्ते पावसाळ्यापूर्वी बुजविण्याचा आदेश ठेकेदाराला देण्यात आला होता. मात्र ठेकेदाराने महापालिकेच्या आदेशाला अक्षरश: केराची टोपली दाखविली. त्यामुळे ऐन पावसाळ्यात चिखल तुडविण्याची वेळ ओढावल्याने ओ शेठ कसा झालाय चिखल थेट, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
माळीवाडा, दिल्लीगेट, चिततळे रोड, बागडपट्टी, कापडबाजार, चौपाटी कारंजा, रामचंद्र खुंट, झेंडीगेट आदी रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. हे रस्ते भुयारी गटार योजनेचे काम सुरू होण्याआधी उत्तम नाही, पण बरे होते. भुयारीमुळे रस्त्यांची चाळण झाली. नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून खोदलेले रस्ते ताबडतोब दुरुस्त करण्याची अट होती. ठेकेदाराने काही जेसीबीच्या साहाय्याने, तर काही रस्ते मजुरांमार्फत खोदून त्यात पाइप टाकले. वास्तविक पाहता रस्त्याचा खोदला भाग ताबडतोब बुजविणे अपेक्षित होते. परंतु, ठेकेदाराने रस्ते बुजविण्याची तसदी घेतली नाही. लॉकडाऊनच्या काळात वाहतूक बंद होती. त्यामुळे रस्ते दुरुस्तीसाठी ही एकप्रकारे संधीच होती. परंतु, या काळातही ठेकेदाराने रस्त्यांची दुरुस्ती केली नाही. शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी बैठक घेऊन रस्ते दुरुस्त करण्याचा आदेश दिला होता. खासदार डॉ. सुजय विखे यांच्या बैठकीतही वेळोवेळी रस्ते दुरुस्तीबाबत चर्चा झाली. महापौरांनीही बैठक घेऊन सूचना केल्या. परंतु, ठेकेदाराने लोकप्रतिनिधींच्या आदेशालाही केराची टोपली दाखविली. उन्हाळ्यात रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने पावसाळा सुरू होताच सर्वत्र चिखल झाला असून, नागरिकांना घरातून बाहेर पडणेही कठीण झाले आहे.
.....
लोकप्रतिनिधींचा मॉडेल सिटीचा प्रकल्प गाळात फसला
भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण करून मध्यवर्ती शहरातील ७० टक्के रस्ते नव्याने करण्यासाठी निधीही मंजूर झाला. जिल्हा नियोजन व शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून लोकप्रतिनिधी कोट्यवधींचा निधी मंजूर करून घेतला. या कामांची निविदाही निघाली. कार्यारंभाचा आदेशही दिला गेला. परंतु, भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झाल्याशिवाय ही कामे करता येत नाहीत. त्यामुळे निधी प्रशासकीय यंत्रणांनाही हात धरून बसावे लागले. या घोळात उन्हाळा गेला. पावसाळा सुरू झाला.
....
जिल्हा नियोजनमधील ९ रस्त्यांची कामे थांबली
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे नुकतेच काँक्रिटीकरण करण्यात आले असून, उर्वरित ९ रस्त्यांची कामे भुयारी गटार योजनेमुळे रखडली आहेत. त्यामुळे यंदाचा पावसाळा नागरिकांना चिखलातूनच प्रवास करावा लागणार आहे.
...
वैशिष्ट्यपूर्ण योजज्त ३३ कामे रखडली
शासनाच्या मूलभूत सोयी-सुविधांचा विकास योजनेंतर्गत शहरातील ३३ रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली. या कामांसाठी निविदाही मंजूर केली गेली. परंतु, भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराने खोदलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण केली नाहीत. त्यामुळे ही कामे रखडली असून, रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नगरकरांना आता ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
.....
भुयारीचे काम थांबवून नगरकरांची बोळवण
भुयारी गटार योजनेचे पाइप टाकण्यासाठी खोदलेले रस्ते बुजविण्याबाबत तक्रारी झाल्यानंतर महापालिकेने काम तात्पुरते थांबविले. याबाबत आयुक्त शंकर गोरे यांच्याशी संपर्क केला असता गोरे म्हणाले, भुयारी गटार योजनेचे काम थांबविले आहे, असे त्यांनी सांगितले. परंतु, खोदलेल्या रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती का झाली नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
..
सूचना : फोटो साजिदने दिले आहेत.