केडगाव : नगर शहराप्रमाणेच नगर तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचे थैमान सुरूच आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १२ हजारांच्या घरात गेली असून कोरोनाने आतापर्यंत तालुक्यातील १९९ जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे आता गावोगावी जनता कर्फ्यूची गरज निर्माण झाली असून ग्रामसमित्यांनी यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
नगर तालुक्यातील १०६ गावांतील १ लाख ३९ हजार ९४४ लोकसंख्येपैकी आतापर्यंत ११ हजार ४५७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ९६६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र तालुक्यातील १९९ जणांचा आतापर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या तालुक्यात १ हजार ५९२ सक्रिय रुग्ण असून यातील १५४ रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ३९ गावांत एकही रुग्ण आढळून आला नाही. मात्र, एप्रिलअखेरपर्यंत तालुक्यातील सर्वच्या सर्व गावांत कोरोनाने शिरकाव केला आहे. फक्त एप्रिल महिन्यातच तालुक्यात ९ हजार ८२४ इतके रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात आता सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. नगर शहराप्रमाणेच तालुक्यातही कडक लॉकडाऊनची आवश्यकता असून यासाठी गावोगावच्या ग्राम समित्यांनी पुढाकार घेऊन गावात स्वयंस्फूर्तीने कडक जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करणे गरजेचे बनले आहे. तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी जेऊर केंद्रात सर्वाधिक १ हजार ६८८ रुग्ण आढळून आले असून टाकळी काझी केंद्रात सर्वाधिक ३७ मृत्यू झाले आहेत. तालुक्यात सर्वांत कमी रुग्णसंख्या मेहेकरी केंद्रात ८७२ इतकी आहे. जेऊर गावाने वाढती रुग्णसंख्या पाहून स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूची अंमलबजावणी सुरू केली आहे. इतर गावांनीही असा निर्णय घेण्याची गरज आहे.
...........
तालुक्यातील प्राथमिक केंद्रनिहाय रुग्णसंख्या
मेहेकरी - ८७२ देवगाव - १४८४ जेऊर - १६८८ चास -१४७७
टाकळी काझी - १२४० वाळकी- ११९१ देहेरे - १३६४ टाकळी खातगाव - १२६१ रुई छत्तीशी- ८८०
..............
तालुक्याची सद्य:स्थिती
एकूण रुग्ण - ११४५७
एकूण मृत्यू - १९९
बरे झालेले - ९६६६
सक्रिय रुग्ण- १५९२
एप्रिलमधील रुग्ण - ९८२४
....................
नगर तालुक्यात कडक जनता कर्फ्यू पाळला जावा, यासाठी मी वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा केली आहे. लाॅकडाऊनचे अधिकार हे तहसीलदार यांना नाहीत. मात्र, ग्रामस्तरावर गावकरी जनता कर्फ्यू स्वयंस्फूर्तपणे जाहीर करू शकतील. फक्त निर्णय घेऊन उपयोग नाही. त्याची स्वयंस्फूर्तपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
- उमेश पाटील, तहसीलदार, नगर
...............
नगर तालुक्यात फक्त ४ गावांनी घेतला निर्णय
नगर तालुक्यातील १०६ गावांपैकी फक्त नवनागापूर, जेऊर, कोल्हेवाडी, चिंचोडी पाटील या गावांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत गाव ७ दिवस पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इतर गावांनीही असा निर्णय घ्यावा, असे आवाहन तहसीलदार उमेश पाटील, गटविकास अधिकारी सचिन धाडगे यांनी केले आहे.