अहमदनगर : गणेशोत्सव सुरू असला तरी सार्वजनिक मंडळांचे उपक्रम, देखावे यंदा बंद आहेत. शासनाच्या नियमांचे पालन करून मंडळांबरोबरच नागरिकांनीही संयम दाखविला. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या जवळपास दोनशेने कमी झाली आहे. त्यामुळे नगरकरांनाही दिलासा मिळाला आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी नगर जिल्ह्यात मात्र रोजच सातशे ते आठशे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात पारनेर आणि संगमनेरमध्ये शंभर ते दीडशे जण रोजच बाधित होत आहेत. बुधवारी या दोन्ही तालुक्यांतील कोरोना रुग्णांची संख्या शंभराच्या आत आली होती. गुरुवारीही संगमनेर तालुक्यात १०२, तर पारनेर तालुक्यात ८७ रुग्ण आढळून आले. इतर सर्व तालुके शंभराच्या आत असून, नगर शहरात २७ रुग्ण आढळून आले आहेत.
सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. व्यापारपेठेत चांगली गर्दी होत आहे. त्यात साखरपुडे, लग्नही धूमधडाक्यात होत आहेत. या गर्दीमुळे कोराेना वाढण्याची शक्यता होती. मात्र, नागरिक नियमांचे पालन करीत असल्याचे दिसते आहे.
यंदा शासकीय नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्याचा मंडळांनी निर्णय घेतला होता. सर्व उपक्रम ऑनलाईन घेतले जात आहेत. आरतीलाही मर्यादित लोक असतात. देखावे नसल्याने नागरिकांचीही गर्दी नाही. त्यात गणपती मंदिरांच्या बाहेर भाविक दर्शनासाठी येतात. तेही नियम पाळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसते आहे.
जिल्ह्यात गुरुवारी ८७० रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २४ हजार ४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ९६.४४ टक्के इतके झाले आहे. जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत ६४२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार २५० इतकी झाली आहे. गुरुवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १६८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २३८ आणि अँटिजन चाचणीत २३६ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर (२७), राहाता (६६), संगमनेर (१०२), श्रीरामपूर (१३), नेवासे (२४), नगर ग्रामीण (५८), पाथर्डी (३४), अकोले (३१), कोपरगाव (१३), कर्जत (३४), पारनेर (८७), राहुरी (२७), भिंगार (०१), शेवगाव (२५), जामखेड (१२), श्रीगोंदा (७४), इतर जिल्हा (१४) येथील रुग्णांचा समावेश आहे.
---------
कोरोना स्थिती
एकूण रुग्णसंख्या : ३,३५,९८९
बरे झालेली रुग्णसंख्या : ३,२४,०४३
उपचार सुरू असलेले रुग्ण : ५२५०
पोर्टलवरील मृत्यू नोंद : ६६९६