अहमदनगर : आता मास्क न वापरल्यास किंवा कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास पाचशेऐवजी २०० रुपये दंड वसूल केला जाणार आहे. पाचशे रुपयांच्या दंडावरून नागरिक आणि प्रशासनातील कर्मचाऱ्यांची नेहमीच हुज्जत होते. तसेच मास्क न वापरल्यास होणारी ५०० रुपयांच्या दंडाची रक्कम कमी करण्याबाबत पोलीस प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली.
आता २०० रुपये दंडाबाबत दिलेल्या आदेशाची सोमवार (दि. १५) पासून अंमलबजावणी होणार असून ३१ मार्चपर्यंत हा आदेश कायम राहणार आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सार्वजनिक व धार्मिक ठिकाणी मास्क न वापरणे, थुंकणे, सामाजिक अंतर न पाळणे, धूम्रपान न करणे आदी नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे. याबाबत आदेशाचे उल्लंघन झाल्यास ५०० रुपये दंडाची कारवाई करण्यात येत होती. त्याऐवजी १५ मार्चपासून ते ३१ मार्चपर्यंत पाचशेऐवजी २०० रुपये दंडाची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी दिला होता. त्याला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी परवानगी दिल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली.
दरम्यान, धार्मिक स्थळी संबंधित ट्रस्टने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याबाबत दक्षता घेण्याचा आदेशही देण्यात आला होता. याबाबत कार्यवाही न केल्यास सर्व खर्च संबंधित ट्रस्टकडून वसूल करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.