पारनेर : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी ठरवून दिलेले निकष पूर्ण न करणाऱ्या संस्थावरील कारवाई रखडली आहे़ त्यामुळे महाविद्यालयांतील त्रुटी विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीच लढा पुकारला आहे़ निकष पूर्ण न करणाऱ्या संस्थांची व त्यांना संरक्षण देणाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी हजारे यांनी केली आहे़ याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले असून, राष्ट्रपती व पंतप्रधानांनाही पत्र पाठविणार आहेत़हजारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, राज्यातील ३६५ अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी अनेक महाविद्यालयांमध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या निकषांचे पालन केलेले नाही़ या महाविद्यालयांमधून गरीब विद्यार्थ्यांची लूट चालली आहे़ निकष न पाळणाऱ्या संस्थांमधून देशाला चांगले अभियंते कसे मिळू शकतील, असा प्रश्नही हजारे यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिक्षक नाहीत किंवा पुरेशी जागा नसून विद्यार्थ्यांना पुरेशा शैक्षणिक व इतर सुविधा नाहीत़ तरीही अनेक महाविद्यालये राजरोसपणे सुरु आहेत. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने सन २००० व २००२ मध्ये राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांना सर्व निकष पूर्ण करण्यासाठी २००८ पर्यंत मुदत दिली होती. मात्र सहा वर्षांनंतरही अनेक संस्थांनी निकष पूर्ण केले नाहीत़ राज्यातील २३ महाविद्यालयांवर कारवाई केली असून, इतर महाविद्यालयांना या कारवाईतून का वगळण्यात आले, असा प्रश्न हजारे यांनी उपस्थित केला आहे़ शिक्षण समितीसुध्दा महाविद्यालयातील त्रुटींकडे दुर्लक्ष करुन शुल्क वाढीस मान्यता देत आहे़ ही विद्यार्थ्यांची फसवणूक आहे. राज्यातील अशा संस्थांकडे दुर्लक्ष करणारे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अधिकारी व त्यांना संरक्षण देणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रपती व पंतप्रधानांकडे करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)
आता अण्णांचा अभियांत्रिकी महाविद्यालयांविरोधात लढा
By admin | Updated: July 4, 2014 01:21 IST