अहमदनगर : महापालिकेचा घनकचरा विभागप्रमुख नरसिंह पैठणकर हा लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकला. त्यामुळे रिक्त झालेल्या घनकचरा प्रमुख पदाचा पदभार घेण्यास अधिकारी तयार नाहीत. घनकचरा विभाग नको रे बाबा, अशी भूमिका महापालिकेतील प्रमुख अधिकाऱ्यांनी घेतली आहे.
महापालिकेतील घनकचरा विभाग पैठणकर याच्यावरील कारवाईमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. शहरातील कचरा संकलन व प्रक्रिया, स्वच्छता अभियान, घर ते घर कचरा संकलन, बायो मेडिकल कचरा आदी घनकचरा विभागाच्या अखत्यारीत येतात. प्रक्रिया प्रकल्पाची कामे घेतलेल्या ठेकेदाराकडून अडीच लाख रुपयांची लाच घेताना पैठणकर पकडला गेला. त्यामुळे घनकचरा विभागप्रमुख हे पद रिक्त झाले. या पदावर व आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांची सामान्य प्रशासनाने नियुक्ती केली होती; परंतु राजूरकर यांनी या विभागाचा पदभार घेण्यास नकार दिला. तसे पत्र त्यांनी प्रशासनाला दिले आहे. हा विभाग यापूर्वी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याकडे होता. प्रकल्पाचे अभियंता आर. जी. मेहेत्रे यांनाही विचारणा केली गेली; परंतु त्यांनीही नकार दिला. घनकचरा विभाग हा उपायुक्त यशवंत डांगे यांच्या अखत्यारीत येतो. त्यांनी सहायक आयुक्त संतोष लांडे यांच्याकडे घनकचरा विभागप्रमुख पदाचा पदभार देण्याबाबत प्रस्ताव दिला होता; परंतु घनकचरा विभागप्रमुख हे पद सहायक आयुक्त लांडे यांना देता येणार नाही, असे सामान्य प्रशासनाकडून कळविण्यात आले. घनकचरा विभागात स्वच्छता निरीक्षक आहेत. त्यांच्यापैकीच एकाची घनकचरा विभागप्रमुख म्हणून नियुक्ती करावी, असे असे काहींचे म्हणणे आहे; परंतु स्वच्छता निरीक्षकही हे पद घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे घनकचरा विभागाला वाली कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
.......