अहमदनगर : निजामशाहीत झालेल्या लढाईत वापरल्या गेलेल्या तोफगाड्याची पोलादी धाव असलेली दोन लाकडी चाके नगर तालुक्यातील सारोळा बद्दी येथे विहीर खोदताना सापडली आहेत. हा ऐतिहासिक अनमोल ठेवा ग्रामस्थांनी वस्तू संग्रहालयाकडे सुपुर्द केला आहे.
नगर तालुक्यातील सारोळा बद्दी गावातील प्रगतिशील शेतकरी जालिंदर छगन हजारे यांच्या शेतातील विहिरीमधील गाळ काढताना ही चाके सापडली. सुमारे शंभर किलो वजनाची ही चाके विहिरीतून वर काढणेही सोपे नव्हते. हजारे यांनी ती वर काढून नीट सांभाळून ठेवली. एवढ्या दिवस विहिरीत राहूनही ही चाके गंजली नाहीत किंवा त्याचे लाकूड खराब झाले नाही.
राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक पोपटराव धामणे काही वर्षे सारोळा बद्दी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते. तोफगाड्याची चाके नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाला दिली तर हा मौल्यवान ठेवा कायमस्वरूपी जपला जाईल आणि गावाचेही नाव त्याबरोबर नोंदवले जाईल, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. हजारेंसह सगळ्या ग्रामस्थांनी तो आनंदाने मान्य केला. सारोळा बद्दी गावात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात हजारे कुटुंबाने तोफगाड्याची ही चाके ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाला देऊ केली. संग्रहालयाचे अभीरक्षक डाॅ. संतोष यादव, विश्वस्त भूषण देशमुख, नारायणराव आव्हाड, पोपटराव धामणे, जालिंदर हजारे, सरपंच सचिन लांडगे, माजी सरपंच भीमराज लांडगे व भीमराज बोरुडे, सांडव्याचे माजी सरपंच अजय बोरुडे, निवृत्त सैन्य अधिकारी बन्सी डाके, ग्रामपंचायत सदस्य सुभाष बोरुडे, नगरमहापालिकेचे उपायुक्त संतोष लांडगे, राहुल हजारे आदी वेळी उपस्थित होते.
संग्रहालयात असलेली हरिश्चंद्रगडावरील तोफ ठेवण्यासाठी या चाकांचा उपयोग केला जाईल. चाकांसाठी वापरलेले लाकूड व पोलाद उत्तम दर्जाचे आहे. चाकांचा व्यास सुमारे साडेतीन फूट आहे.
-----------------
दगड वाहण्यासाठी गाडा?
निजामशाहीत ‘दुर्बीण महाल’ (सलाबतखान मकबरा, जो चांदबीबी महाल म्हणूनही ओळखला जातो.) बांधण्यासाठी डोंगरावर अवजड दगड वाहून नेण्यास या चाकांचा वापर केला गेला असावा, अशी शक्यता सारोळा बद्दीच्या ग्रामस्थांनी व्यक्त केली. हे गाव महालाच्या जवळच आहे. सारोळा बद्दी गावात निजामशाही काळात बांधलेली गढी असून ती गढी सलाबतखानाची होती, असे ग्रामस्थ सांगतात. गढीच्या अनुषंगाने इतिहास अभ्यासकांनी शोध घेतल्यास बरीच ऐतिहासिक माहिती हाती येईल. दुर्बीण महाल ते गढीपर्यंत भुयारी रस्ता होता, असे त्या गढीत राहणारे मुस्लीम बांधव सांगतात. महालाच्या परिसरातील शेतकऱ्यांना तत्कालीन औजारे, हत्यारे सापडल्याचे सारोळा बद्दीचे ग्रामस्थ सांगतात. लोकांना त्या वस्तूंचे महत्त्व लक्षात न आल्याने त्या वस्तू काळाच्या ओघात नष्ट होत आहेत.
-----------
फोटो - ३१निजामकालीन तोफ
निजामकालीन तोफगाड्याची पोलादी धाव असलेली दोन लाकडी चाके नगर तालुक्यातील सारोळा बद्दी येथे विहीर खोदताना सापडली आहेत. हा ऐतिहासिक ठेवा ग्रामस्थांनी नगरच्या वस्तू संग्रहालयाकडे सुपुर्द करण्यात आला.